संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 14 :- नागपूर शहराचे उपनगर मानले जाणारे तालुकादर्जा प्राप्त कामठी शहराची लोकसंख्या ही दोन लाखाच्या घरात असून शासकीय नोकऱ्या अभावी बेरोजगार तरुणांची फौज निर्माण झाली असल्याने नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या कित्येक बेरोजगारांनी व्यवसाय करण्याकडे आपला कल वाढविला आहे.या शहरातील पिढीजात व्यवसाय आज लोपपावला आहे.अशा स्थितीत येथील युवा वर्ग नव्या रोजगारासाठी वणवण भटकत आहे.नागपूर शहरात महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, मौलाना अब्दुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळ,यशवंतराव चव्हाण आर्थिक विकास महामंडळ इत्यादी महामंडळे कार्यरत आहेत.मात्र इतके वर्षे लोटूनही या तिन्ही महामंडळातील एकही कार्यालय कामठी शहरात नसल्याची शोकांतिका आहे.
बेरोजगार युवकांनी नोकरीच्या शोधात न राहता स्वतःचा व्यवसाय त्यांनी सुरू करावा यासाठी उपरोक्त नमूद आर्थिक महामंडळ तसेच इतर महामंडळाकडून अनुदान स्वरूपात कर्ज उपलब्ध करून दिले जाते.नागपूर जिल्ह्यातील सुशिक्षित युवा बेरोजगारांच्या आर्थिक विकासासाठी दलित वर्गासाठी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, मुस्लिम समाजासाठी अब्दुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळ, भटक्या व विमुक्त जातीसाठी यशवंतराव चव्हाण आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे.या महामंडळाकडून संबंधित श्रेणीच्या सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग व व्यवसायासाठी 50 टक्के अनुदानावर कर्ज उपलब्ध करून दिले जाते तरीही या महामंडळाकडून सहा सहा महिने उशिरा कर्ज मिळते .तालुकादर्जाप्राप्त कामठी शहरात एकही आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय नसल्याने सुशिक्षित बेरोजगारांना नागपुरात जाऊन त्या आर्थिक विकास महामंडळ कार्यालयात खेटे खावे लागतात.वाढती महागाई त्यातच नागपूर कामठी इतका प्रवास आता पूर्वीइतका स्वस्त राहलेला नाही .तसेच या महामंडळाकडे अनेक बेरोजगार तरुण व्यवसाय किंवा उद्योग सुरू करून आपल्या पायावर उभे होण्यासाठी कर्जाची मागणी करतात परंतु त्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध होत नाही .शहरातील अनेक बेरोजगार सांगतात की या कार्यालयात दलालांचे साम्राज्य निर्माण झाल्याचे सांगतात त्यांच्या माध्यमातून गेल्यास काम तातडीने होत असल्याचे सांगतात.
नोकऱ्या लागत नाही त्यामुळे येथील बेरोजगार तरुणांना रोजगाराची व्यवसाय उभारण्याची आवश्यकता आहे अशा स्थितीत आर्थिक विकास महामंडळाचे एकही कार्यालय कामठी शहरात उपलब्ध नसल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेत कामठी शहरात लवकरात लवकर आर्थिक विकास महामंडळ कार्याल्याची सोय करावी अशी मागणी येथील बेरोजगार तरुण वर्ग करीत आहे.