नागपूर :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये नागपूर विभागातील 14 लाख 25 हजार शेतकरी खातेदारांनी सुमारे 11 लाख 64 हजार 635 हेक्टर क्षेत्रातील विविध पीकांचा विमा काढला असून विभागात सरासरी 94 टक्के शेतकऱ्यांनी पीक नुकसानीपासून पीक विम्याचे संरक्षण मिळविले आहे. मागील वर्षी केवळ 2 लाख 97 हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता.
खरीप हंगामामध्ये विविध पीकांच्या संरक्षणाबाबत शासनाने केवळ 1 रुपया भरुन प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेस शेतकऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला असून यामध्ये कर्जदार व बिगरकर्जदार शेतकरी खातेदारांनी सहभाग नोंदविला आहे. विभागातील सर्व खातेदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले होते.
मागील वर्षी 2 लाख 97 हजार शेतकरी खातेदारांनी विमा योजनेत सहभाग नोंदविला होता. यावर्षी विभागात 94 टक्के विमा उतरविला आहे. यामध्ये सर्वाधिक वर्धा जिल्ह्यात 112 टक्के शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. भंडारा जिल्ह्यात 107 टक्के, चंद्रपूर 98 टक्के, गोंदिया 92 टक्के, गडचिरोली 82 टक्के तर नागपूर जिल्ह्यातील 75 टक्के शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले आहेत.
विभागात 15 लाख 14 हजार 483 शेतकरी खातेदार असून यामध्ये 3 लाख 42 हजार 210 कर्जदार शेतकरी तर 10 लाख 82 हजार 861 बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सुमारे 11 लाख 64 हजार 635 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला आहे. या योजनेमुळे 57 कोटी 42 लाख 75 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळाले आहे.
वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक सहभाग
प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये वर्धा जिल्ह्यातील 112 टक्के शेतकरी खातेदारांनी सहभाग नोंदविला असून नागपूर विभागात सर्वाधिक वर्धा जिल्ह्यातील 2 लाख 45 हजार 399 शेतकऱी खातेदारांनी 2 लाख 53 हजार 139 हेक्टर क्षेत्राचा विमा काढला आहे. भंडार जिल्ह्यातील 2 लाख 55 हजार 988 शेतकऱ्यांनी 1 लाख 24 हजार 678 हेक्टर क्षेत्र (107 टक्के), चंद्रपूर जिल्हयातील 3 लाख 27 हजार 210 शेतकरी सभासदांनी 3 लाख 7 हजार 497 हेक्टर (98 टक्के), गोंदिया जिल्ह्यातील 2 लाख 37 हजार 466 शेतकऱ्यांनी 1 लाख 20 हजार 321 हेक्टर (92 टक्के), गडचिरोली जिल्ह्यातील 1 लाख 25 हजार 133 शेतकऱ्यांनी 1 लाख 18 हजार 719 हेक्टर (82 टक्के) तर नागपूर जिल्ह्यातील 2 लाख 33 हजार 875 शेतकरी खातेदारांनी 2 लाख 40 हजार 181 हेक्टर (75 टक्के) विम्याचे संरक्षण मिळविले आहे.