पाच वर्षांत विकली 83 लाखांची तिकिटे

– रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍यांत भरली धडकी

नागपूर :- हनुमाननगरात मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या समांतर रेल्वे तिकीट केंद्राचा आरपीएफच्या पथकाने भंडाफोड केला. तपासात प्रवीण झाडे (43) रा. प्रोफेसर कॉलनी याने आजपर्यंत तब्बल 83 लाख रुपये किमतीच्या तिकिटांची विक्री केल्याचे समोर आले. ही कारवाई शनिवार, 13 मे रोजी करण्यात आली. दुसर्‍याही दिवशी कारवाई सुरूच होती. या प्रकरणी आरपीएफने गुन्हा दाखल केला असून, आरोपीला न्यायालयात हजर केले. या कारवाईमुळे दलालांमध्ये धडकी भरली असून, काही भूमिगत झाले आहेत.

रेल्वे तिकिटांच्या काळाबाजारीवर आळा घालण्यासाठी दलालांवर सतत पाळत ठेवली जाते. सध्या प्रवाशांची वाढती गर्दी आणि लांबत चाललेली प्रतीक्षा यादी लक्षात घेता मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या आदेशानुसार विभागीय पथक सज्ज होते. सायबर सेलच्या मदतीने दलालांवर पाळत ठेवली जात होती. अशातच हनुमाननगरात अनधिकृत तिकीट विक्री केंद्राचे मोठे रॅकेट सुरू असल्याचे संकेत मिळाले. आरपीएफ निरीक्षक आर. एल. मीणा यांच्या नेतृत्वात प्रियंका सिंह, एसएसआय अश्विनी पवार, हवालदार संदीप सोनवणे, अमोल चाहातगुणे, रामनिवास मीणा, ललित गुज्जर, श्याम सरेआम यांच्या पथकाने प्रोफेसर कॉलनीत धाड मारली.

प्रवीण मागील पाच वर्षांपासून घरूनच तिकीट विक्री करायचा. झडतीदरम्यान मागील पाच वर्षांचा रेकॉर्ड तपासला असता दुपारपर्यंत जवळपास 83 लाख रुपयांची तिकीट विक्री केल्याचे समोर आले. एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून गरजूंना आरोपी तिकीट विक्री करायचा. आधुनिक सॉफ्टवेअरने एकाच वेळी 20 पेक्षा अधिक तिकिटे घेता येतात. अशाच सॉफ्टवेअरचा प्रवीणने वापर केल्याचे आरपीएफ निरीक्षक मीणा यांनी सांगितले. प्रवीणच्या घरून दोन लॅपटॉप, एक मोबाईल आणि 37 लाईव्ह तिकिटे जप्त करण्यात आली. तपास सुरू असून, हा आकडा कोटींवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

अधिकृत एजंटना मिळतो आयडी नंबर

आयआरसीटीसीतर्फे देशभरात अधिकृत रेल्वे तिकीट केंद्रे देण्यात आली आहेत. अधिकृत एजंट्सना आयडी नंबर दिला जातो. याच आयडी नंबरचा वापर करून तिकिटे घेतली जातात. एका तिकिटावर विशिष्ट कमिशन असते. मात्र, कमी वेळात जास्त नफा मिळविण्यासाठी काही दलाल बनावट आयडी नंबरचा वापर करतात. आधुनिक सॉफ्टवेअरने अशा दलालांचे काम सोपे झाले आहे.

प्रतीक्षा यादी लांबली

उन्हाळ्याच्या सुट्या आणि लग्नसराईचे दिवस असल्याने प्रवाशांची गर्दी वाढली आहे. बहुतांश रेल्वेगाड्यांत प्रतीक्षा यादी लांबत चालली आहे. प्रत्येकाला कन्फर्म तिकीट पाहिजे असते. प्रवाशांची ही अडचण लक्षात घेता अनधिकृत दलाल सक्रिय होतात व चढ्या दराने तिकिटांची विक्री करतात.

विमानतळावर रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल नागपूर विमानतळावर रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करताना आरपीएफच्या पथकाने हर्षित जोशी (33) या युवकाला पकडले. त्याच्याकडून तीन तिकिटे जप्त करण्यात आली.

नागरिकांना सोईचे व्हावे म्हणून रेल्वेतर्फे विमानतळावर तिकीट केंद्र देण्यात आले. दक्षिण- पूर्व-मध्य रेल्वेअंतर्गत आरपीएफ गुन्हे शाखेचे या केंद्रावर लक्ष होते. रेल्वे तिकीट खरेदी करून चढ्या दराने विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक नंदबहादूर यांना मिळाली. त्यांनी केंद्रावर पाळत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार शनिवारी सायंकाळच्या सुमारास सहायक उपनिरीक्षक पवन सिंग, एस. सिडाम यांनी विमानतळ गाठले व केंद्र परिसरात लक्ष ठेवून होते. दरम्यान हर्षितने 8 हजार 395 रुपये किमतीची तीन तिकिटे घेतली. तो बाहेर पडत असतानाच पथकाने त्याची विचारपूस केली. त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे आरपीएफ ठाण्यात आणून त्याची सखोल चौकशी करण्यात आली. रेल्वे तिकिटांची काळाबाजारी केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कलम 143 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सहायक उपनिरीक्षक ए. एस. तिनगाम करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मेट्रो ने किया मातृ शक्ति का स्वागत

Mon May 15 , 2023
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपुर मेट्रो रेल परियोजना) ● स्टेशनों पर बच्चों को बांटी चॉकलेट नागपुर :- महामेट्रो की ओर से मदर्स डे पर मेट्रो स्टेशनों पर नन्हे-मुन्ने बच्चों के साथ सफर करने के लिए पहुची मातृ शक्ति का स्वागत कर नन्हें-मुन्नों को स्टेशन पर तैनत अधिकारी और कर्मियों ने चॉकलेट वितरित की। महामेट्रो की ओर से नागपुर मेट्रो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com