Ø वेळा हरिश्चंद्र येथून विभागीय आयुक्तांनी केला शुभारंभ
Ø प्रधानमंत्र्यांच्या स्वावलंबनाच्या सूत्राला तरुणाईचा प्रतिसाद
नागपूर :- प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील तरुणाईला स्वावलंबनाचा नवा मूलमंत्र प्रेरक ठरला. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात सर्व 64 केंद्रांचे आज थाटात उद्घाटन झाले, यास तरुणांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाषण यावेळी तरुणांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.
ग्रामीण भागातील व्यक्तींसाठी स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र योजनेचा राज्यव्यापी शुभारंभ झाला. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या उपस्थितीत नागपूर ग्रामीणच्या वेळा हरिश्चंद्र गावातील साई सांस्कृतिक लॉनवर आयोजित कार्यक्रमात विभागासाठी या योजनेचा प्रारंभ झाला. नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यांतील 64 ग्रामपंचायतींमध्ये ही योजना सुरू झाली असून या केंद्रांद्वारे 6400 व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या गावात, उद्योग व्यवसायाची सुरुवात कशी करायची याचा मूलमंत्र मिळत असल्याबद्दल तरुणांनी आनंद व्यक्त केला आहे. जागतिकीकरणाच्या बदलत्या युगात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. अशा बदलणाऱ्या तंत्रज्ञानाला गावाच्या कक्षेमध्ये आणण्याचा महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याच्या प्रतिक्रिया तरुणांनी दिल्या आहे.
नागपूर जिल्ह्याच्या 13 तालुक्यातील 13 ग्रामपंयाचतींमध्ये, भंडारा जिल्ह्याच्या 7 तालुक्यातील 8, चंद्रपूर जिल्ह्याच्या 15 तालुक्यातील 15, गडचिरोली जिल्ह्याच्या 12 तालुक्यातील 12, गोंदिया जिल्ह्याच्या 8 तालुक्यातील 8 आणि वर्धा जिल्ह्याच्या 8 तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्र उभारण्यात आली आहेत.
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यात तीन प्रशिक्षण संस्थांद्वारे 1300 व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यात तीन प्रशिक्षण संस्थांद्वारे 800, चंद्रपूर जिल्ह्यात दोन प्रशिक्षण संस्थांद्वारे 1500, गडचिरोली जिल्ह्यात चार प्रशिक्षण संस्थांद्वारे 1200, गोंदिया जिल्ह्यात तीन प्रशिक्षण संस्थांद्वारे 800 आणि वर्धा जिल्ह्यात दोन प्रशिक्षण संस्थांद्वारे 800 व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
वेळा हरिश्चंद्र येथील कार्यक्रमात विभागीय आयुक्तांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या योजनेच्या माध्यमातून विभागातील ग्रामीण भागामध्ये रोजगाराला चालना मिळेल आणि स्थानिक उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ प्राप्त होईल, असा विश्वास बिदरी यांनी यावेळी व्यकत केला. विभागातील जास्तीत जास्त जनतेने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्य अधिकारी विपुल जाधव, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, गट विकास अधिकारी राजनंदिनी भागवत, उपविभागीय अधिकारी मनोहर पोटे, तहसिलदार प्रताप वाघमारे आदी उपस्थित होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तसेच महाविद्यालयांचे विद्यार्थी, गावकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी ,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीद्वारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्रातील एकूण 34 जिल्ह्यांतील 511 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ झाला.