जहांगीर कलादालन येथे ६३ व्या राज्य कला प्रदर्शनाला सुरुवात

– कलाकारांनी मुंबईला नवी दृश्य ओळख ओळख करून द्यावी: राज्यपालांची सूचना

मुंबई :- दृश्य कला व वास्तुकला नगरांना तसेच महानगरांना दृश्य ओळख करून देतात. ‘गेटवे ऑफ इंडिया’ मुंबईची तर ‘इंडिया गेट’ दिल्लीची दृश्य ओळख करून देतात. ‘स्टॅचू ऑफ लिबर्टी’ने न्यूयॉर्कला तर ‘आयफेल टॉवर’ने पॅरिसला दृश्य ओळख करुन दिली आहे. कला व वास्तुकलेत समृद्ध असलेल्या भारतातील कलाकारांनी स्वातंत्र्याच्या अमृत काळात मुंबईला एक नवी दृश्य ओळख देणारी कलाकृती निर्माण करावी, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. अश्या प्रकारच्या नव्या दृश्य कलाकृतीमुळे देशाचा इतिहास, समृद्ध वारसा व जीवनमूल्ये जगापुढे येतील असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य कला संचालनालयातर्फे आयोजित ६३ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे (कलाकार विभाग) उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १३) जहांगीर कलादालन येथे पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते जाहिरात व डिझाईन क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार अरुण पद्मनाभ काळे यांना ‘कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाच लाख रुपये व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. धातुकला क्षेत्रातील कलाकार विवेकानंद दास यांना ६३ वा महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन ज्येष्ठ कलाकार पुरस्कार देण्यात आला. यावेळी दृश्य कला क्षेत्रातील १५ कलाकारांना देखील सन्मानित करण्यात आले.

आपण स्वतः काष्ठ कलाकार असून वेळ मिळेल त्यावेळी काष्ठशिल्पे व देवतांच्या मूर्ती तयार केल्या असल्याचे सांगून लाकूड पाहिल्यावर आपल्या मनात त्यात लपलेली कलाकृती दिसू लागते असे राज्यपालांनी सांगितले. दिवंगत मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या कलाकृती पाहिल्या त्यावेळी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता असे बैस यांनी सांगितले. देशातील अनेक गावांमध्ये कलाकार आहेत, परंतु त्यांचे शोषण होते. हे शोषण बंद झाले पाहिजे व गावागावातील छुप्या कलाकारांना पुढे आणले गेले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.   

ऐतिहासिक वास्तू व वारसा कलाकृती पर्यटन वाढविण्यासाठी, लोकांमध्ये अभिमानाची भावना जागवितात तसेच रोजगार सृजनासाठी मदत करतात. मात्र आपल्याकडे इतिहासाची व वारस्याची उपेक्षा होताना दिसते. यादृष्टीने, सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी कॉर्पोरेट्स व व्यावसायिक घराण्यांना सहभागी करून घेतले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

महाराष्ट्राकडे अजंता – वेरूळ लेणी, शिवकालीन किल्ले, घारापुरी लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आदी जगप्रसिद्ध वारसा स्थळे आहेत. परंतु त्याचा उपयोग करून आपण लोकांसाठी समृद्धी निर्माण करु शकलो नाही. यास्तव वारसा जतनाच्या कार्यात नागरिकांना सहभागी करून घेतले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

जे जे कला महाविद्यालयाने देशाला जी के म्हात्रे व राम सुतार यांच्यासारखे मूर्तिकार तसेच एमएफ हुसेन, अकबर पदमसी, एस एच रझा, के के हेब्बर, वासुदेव गायतोंडे, तैयब मेहता यांसारखे चित्रकार दिले. या महान कलाकारांच्या कलाकृती असलेले स्थायी प्रदर्शन भरवून मुंबईला दृश्यकलेची राजधानी बनवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कलेला महत्व देण्यात आले असून नजीकच्या काळात राज्य कला संचालनालयातील १५० पदे भरण्यात येतील असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी सांगितले.

कुलाबा या भागात जहांगीर कला दालन, वस्तू संग्रहालय, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट यांसारख्या अनेक संस्था असल्यामुळे कुलाबा हा महाराष्ट्राची कला राजधानी आहे असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. कला प्रदर्शनातून उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन मिळते असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कला संचालक राजीव मिश्रा तसेच अनेक कलाकार उपस्थित होते. या प्रदर्शनात राज्याच्या विविध भागांमधून आलेल्या युवा कलाकारांच्या कलाकृती मांडण्यात आल्या असून प्रदर्शन दिनांक १९ फेब्रुवारी पर्यंत खुले राहणार आहे.

यावेळी विभिन्न क्षेत्रातील कलाकार नूरील भोसले, सुनील विणेकर, प्रसाद मेस्त्री, नागनाथ घोडके, सचिन पखाले, पूजा पळसंबकर, अनिकेत गुजरे, ,मुकेश पुरो, प्रसाद गवळी, अभिषेक तिखे, श्रवण भोसले, साक्षी चक्रदेव, योगेश आबुज, प्रसाद निकुंभ व सोहेब कुरेशी या कलाकारांना प्रत्येकी ५०,००० रु. पारितोषिक रक्कम असलेले ६३ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तेरा दिवसांत 2 हजार 509 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

Wed Feb 14 , 2024
नागपूर :- वीज बिलापोटी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणतर्फ़े मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली असुन 1 ये 13 फ़ेब्रुवारी 2024 या 13 दिवसांत नागपूर परिमंडलातील तब्बल 2 हजार 509 थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ग्राहकांनी त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीचा त्वरित भरणा करुन होणारी गैरसोय टाळावी आणि महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे. वीज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com