– अर्ज सादर करण्यासाठी १४ हजार ६३७ मदतकेंद्र
– योजनेच्या माहितीसाठी १८१ हेल्पलाईन
नागपूर :- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला नागपूर विभागात चांगला प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत ६ लक्ष ५७ हजार ९९४ लाभार्थी महिलांनी अर्ज सादर केले आहेत. या योजनेमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदता यावा यासाठी १४ हजार ६३७ मदतकेंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.
महिला व बाल विकास विभागातर्फे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’मध्ये २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटूंबातील केवळ एक अविवाहित महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये इतकी रक्कम आधारलिंक असलेल्या बॅक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी नारीशक्ती दूत ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रशासनातर्फे महिलांना सुलभपणे योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करता यावे यासाठी विभागात १४ हजार ६३७ मदतकेंद्र सुरु केले आहेत. या मदत केंद्रावर पुरेशे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहेत.
विभागात (दिनांक १७ जुलै) २ लाख ५२ हजार ५७ अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले असून ४ लाख ५ हजार ९३७ अर्ज ऑफलाईन प्राप्त झाले आहेत. विभागात सर्वाधिक नागपूर जिल्ह्यात २ लाख ७६ हजार ९१६ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी जिल्ह्यात ३ हजार ४०४ मदतकेंद्र सुरु करण्यात आली आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ४६ हजार ५२६ अर्ज प्राप्त झाले असून २ हजार ३८६ मदतकेंद्र सुरु करण्यात आली आहेत. वर्धा जिल्ह्यात ४५ हजार ५७७ अर्ज (१ हजार ६२७ मदतकेंद्र) , भंडारा जिल्ह्यात ६३ हजार ३५६ (१ हजार ४१७ मदतकेंद्र) , गोंदिया जिल्ह्यात ८५ हजार २१५ अर्ज (१ हजार ९०२ मदतकेंद्र) तर चंद्रपूर जिल्ह्यात ४० हजार ४०४ अर्ज (२ हजार ३८६ मदतकेंद्र) प्राप्त झाले आहेत.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी १८१ हा महिला हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक सुरु करण्यात आला आहे. यावर योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
महिलांचे आर्थिक, सामाजिक पुर्नवसन करण्यासोबतच त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली असून महिला आणि त्यांच्यावर अवलंबुन असलेल्या मुलांना आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा घडवून आणणाऱ्या या योजनेमध्ये महिलांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.