संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने बहुतेक घरे बाधित होऊन जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले होते .तेव्हा या अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या बाधित घरधारकाना नुकसान भरपाई मिळावी यासाठी कामठी तालुक्यातील स्थानिक प्रशासनासह नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांच्या अथक प्रयत्नाला यशप्राप्त होत कामठी तहसील प्रशासनाला खावटी मंजूर करण्यात आली.त्यानुसार आज कामठी तहसील कार्यालयातील सभागृहात आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते कामठी ग्रामीण चे 508,येरखेडा चे 743 व कामठी शहरातील 5607 असे एकूण 6858 बाधित घरधारकाना प्रति लाभार्थी 10 हजार रुपये प्रमाणे 6 कोटी 85 लक्ष रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी,तहसीलदार गणेश जगदाडे,नायब तहसिलदार उपेश अंबादे,कामठी नगर परिषद चे प्रशासक संदीप बोरकर, माजी जी प सदस्य अनिल निधान, भाजप पदाधिकारी अजय अग्रवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मोठ्या संख्येत बाधित घरधारकांनी उपस्थिती दर्शविली होती. तर लवकरात लवकर ही खावटी निधी प्राप्त झाल्याने नागरिकांनी आमदार चंद्रशेखर बावनकुळे,आमदार टेकचंद सावरकर तसेच एसडीओ गोसावी,तहसीलदार जगदाडे,मुख्याधिकारी संदीप बोरकर यांचे आभार मानले.