– शेतकऱ्यांची अडचण सोडविण्यास दिले प्राधान्य
यवतमाळ :- शेती विकासात सर्वात महत्वाचे योगदान असलेल्या पाणंद रस्त्यांअभावी शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेवून पालकमंत्री संजय राठोड यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ५५ पाणंद रत्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पावसाळ्यात शेतात जाण्यायोग्य रस्ते नसल्याने ठिकठिकाणचे शेतकरी सातत्याने पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे शेतात जाण्यायोग्य पाणंद रस्ते देण्याची मागणी करत असतात. या मागणीची दखल घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनास सूचना करून मागणी असलेल्या गावातील शेतकऱ्यांसाठी मातोश्री शेत पाणंद रस्ता योजना राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केळापूर, कळंब, बाभूळगाव, राळेगाव, उमरखेड या तालुक्यांत ५५ पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली. त्यात कळापूर तालुक्यात १२, कळंब १०, बाभूळगाव १८, राळेगाव १४ तर उमरखेड तालुक्यात एका पाणंद रस्त्याच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. या पाच तालुक्यातील ५५ गावांमधील शेतकऱ्यांनी मागणी केल्यानुसार सरासरी दोन किमीचा पाणंद रस्ता तयार करून देण्यात येणार आहे. या कामांना प्राधान्याने सुरूवात करण्याच्या सूचनाही पालकमंत्री संजय राठोड यांनी बांधकाम विभागास दिल्या आहेत. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जाण्यास अडचणींचा सामना करावा लागणार नाही. शिवाय शेतापर्यंत थेट पाणंद रस्ता होणार असल्याने शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसाय करण्यासही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.