– ताजबाग परिसरातील खाजगी ९५ कॅमेरे सिटी ऑपरेशन सेंटरला जोडले
नागपूर :- शहरातील ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा सर्वदूर प्रसिद्ध आहे. सर्वधर्म समभावचे प्रतीक बाबा ताजुद्दीन यांचा वार्षिक उर्स नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उर्स दरम्यान श्रद्धाळुंची गैरसोय होऊ नये, तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात नजर ठेवता यावी याकरिता पोलिसांना नागपूर स्मार्ट सिटीद्वारे लावण्यात आलेल्या कॅमेराची मदत मिळाली.
नागपूर शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी यांचा निर्देशानुसार नागपूर स्मार्ट सिटीच्या ५०० सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून ताजबाग येथे निगा ठेवण्यात आली असून, मोठा ताजबाग परिसरातील हजरत बाबा सय्यद ताजुद्दीन ट्रस्टच्या ९५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना नागपूर स्मार्ट सिटीच्या श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला जोडण्यात आले होते. याकॅमेऱ्यांद्वारे पोलिस विभागाला उर्स, शाही संदल व इतर कार्यक्रमांची पाहणी व परिसरात नजर ठेवण्यासह वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थित राखण्यास मदत झाली. तसेच मोबाईल सर्व्हिलन्स वॅनचा देखील वापर करण्यात आला.
नागपूर स्मार्ट सिटीद्वारा शहरातील ७०० हुन अधिक चौकात ३ हजार ६०० कॅमेरे लावण्यात आले आहेत. यावर मनपा मुख्यालयातील नागपूर स्मार्ट सिटीच्या श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर द्वारे नजर ठेवली जाते. यावर्षी पहिल्यांदाच हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा व मोठा ताजबाग परिसरातील हजरत बाबा सय्यद ताजुद्दीन ट्रस्टच्या ९५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला जोडण्यात आले होते. यामुळे पोलिस विभागाला याची मोलाची मदत मिळाली. याशिवाय नागपूर स्मार्ट सिटीमार्फत दिघोरी परिसर, मोठा ताजबाग व छोटा ताजबाग परिसर, गांधीबाग सेंट्रल एवेन्यू रोड परिसर, महाल, मोमीनपुरा परिसर आणि जवळपासच्या रस्त्यांवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून उर्स दरम्यान निघालेल्या शाही संदल व इतर कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्यासाठी पोलिस विभागाला श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशनची मदत मिळाली.