संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-बीपीएलधारक कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब प्रमुख अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पीडित विधवांना शासनाकडून 20 हजार रुपयांची अनुदान रक्कम मंजूर केली जाते.मात्र मागील सहा महिन्यांपासून अनुदानाची रक्कम प्राप्त झाली नसल्याने या योजनेतून कामठी तालुक्यातील 50 विधवा महिला लाभार्थी अनुदान रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.
मागील काही वर्षांपूर्वी शासनाच्या महसूल प्रशासना अंतर्गत राष्ट्रीय कुटुंब प्रमुख अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली होती. या योजने अंतर्गत बीपीएलधारक कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शासनाकडून त्या कुटुंबातील पीडित विधवा महिलेला शासनाकडून 20 हजार रुपये अनुदान मंजूर केले जाते मागील काही वर्षांपूर्वी शासनाने सुरू केलेल्या या योजने अंतर्गत कामठी तालुक्यातील हजारो पात्र पीडित विधवा लाभार्थ्यांना लाभ मंजूर देखील करण्यात आला आहे.या योजनेचा लाभ मंजूर होताच शासनाकडून वयाच्या आधारावर संजय गांधी व श्रावण बाळ योजने अंतर्गत दरमहा अनुदान देखील उपलब्ध केले जाते परंतु अजूनही अनुदानाची रक्कम उपलब्ध करण्यात आली नाही.
लाभार्थ्यांचे कामठी तहसील कार्यालयात हेलपाटे
– कामठी तालुक्यातील 50 लाभार्थी विधवा महिला या योजनेच्या लाभासाठी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याने कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी आर्थीक संकटात सापडलेल्या विधवा महिला या योजनेच्या लाभासाठी नियमित कामठी तहसील कार्यालयात येत आहेत मात्र अनुदानाची राशी उपलब्ध न झाल्याने कामठी तालुक्यातील 50 पात्र विधवा महिला लाभार्थीना मागील सहा महिन्यांपासून योजनेपासून वंचित राहावे लागले आहे .