आदिवासी गावातील 400 सरपंचांना पोस्टकार्डद्वारे योजनांची माहिती

Ø पांढरकवडा आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम

Ø कार्डवरील क्युआरद्वारे मिळतो योजनांची माहिती

Ø प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याचा प्रयत्न

Ø वंचितांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी सरपंचांना आवाहन

यवतमाळ :- शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजना प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतेच असे नाही. आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाच्यावतीने लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी अतिशय नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. लाभापासून वंचित 400 आदिवासी गावातील सरपंचांना पोस्टकार्ड पाठविण्यात आले असून या कार्डवरील क्युआर कोडवर विभागाच्या योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. क्युआर स्कॅन केल्यानंतर चुटकीसरशी योजना समजून घेता येणार असून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेतांना मदत होणार आहे.

पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकुण 9 तालुके असून त्यात यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, वणी, केळापुर, घाटंजी, झरी जामणीचा समावेश आहे. प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळा 18, अनुदानित आश्रमशाळा 28 व शासकीय वसतीगृह 19 कार्यरत आहे. डोंगराळ व दुर्गम भागात राहणाऱ्या अनुसूचित जमातीची सामाजिक व शैक्षणिक प्रगती होण्यासाठी कार्यालयाच्यावतीने क्षेत्रविकासाचा दृष्टीकोन स्विकारण्यात आला.

आदिवासींचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास व्हावा यासाठी हा विभाग सतत कार्यरत आहे. या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आदिवासी कल्याणाच्या योजनांची माहिती आदिवासी जनतेपर्यंत पोहोचवून शासन व आदिवासी समाज यांच्यामध्ये विश्वासाची भावना निर्माण व्हावी ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची धारणा आहे.

प्रकल्पांतर्गत असलेल्या आदिवासी लाभार्थ्यांसाठी खावटी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार प्रकल्पात आदिवासी गावांची संख्या 963 आहे. त्यापैकी 548 गावांना न्युक्लिअस बजेट योजनेचा लाभ मिळाला आहे तर 415 गावांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. ज्या गावात आजपर्यंत एकही लाभार्थ्यांला न्युक्लीअस बजेट योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्या गावात योजनेची प्रचार प्रसिद्धी झाली नाही, अशा 400 पेक्षा अधिक गावांच्या सरपंचांना पोस्टकार्डद्वारे योजनेची माहिती देण्यात आली आहे.

पोस्टकार्डद्वारे योजनेची माहिती देतांना डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्प अधिकारी गोदाजी सोनार यांनी हा नाविन्यपुर्ण उपक्रम सुरु केला. या पोस्टकार्डवरील क्युआर स्कॅन केल्यावर प्रकल्प कार्यालयाची वेबसाईट उघडल्या जाते व या वेबसाईटवरील आदिवासी विकास विभागाच्या योजनेची सविस्तर माहिती लाभार्थ्यांना बसल्या ठिकाणी पाहता येते व माहिती करून घेता येतात.

कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ दिला जातो. त्यात कुक्कुटपालन, शेळीपालन, व्यवसायासाठी अर्थसहाय, वैद्यकीय – अभियांत्रीकी विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहाय अशा योजनांचा समावेश आहे. पोस्टकार्डवरील क्युआरद्वारे न्यूक्लिअस बजेट योजनेचा लाभ कशाप्रकारे घ्यावा, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

या उपक्रमामुळे वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना योजना समजणार असून त्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आदिवासी 400 गावातील सरपंचांना लिहिलेल्या पोस्टकार्डमध्ये प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी नमूद केले की, आपल्या गावातील लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत योजनांचा लाभ घेतलेला नाही. आपण क्युआरद्वारे नागरिकांना योजना समजून सांगण्यास तसेच अधिकाधीत नागरीकांनी लाभ घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारीपदाच्या पुर्व प्रशिक्षणाची संधी

Wed May 29 , 2024
यवतमाळ :- ज्या विद्यार्थ्यांनी कंबाईन्ड डिफेन्स सर्विसेस या परीक्षेकरीता अर्ज सादर केलेला आहे. अशा विद्यार्थ्यांकडून सीडीएस या परीक्षेची पुर्व तयारी करुन घेण्यासाठी नाशिक येथे विनामुल्य निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील स्थायी नवयुवक व नवयुवतींसाठी दि.१० जून ते दि.२३ ऑगस्ट या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com