अमरावती :-संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला 1 मे, 2023 रोजी स्थापन होऊन चाळीस वर्ष पूर्ण होत आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ व बुलढाणा त्यानंतर कालांतराने अकोला जिल्ह्राचे विभाजन होऊन वाशिम जिल्ह्राची निर्मिती झाली व अमरावती विद्यापीठाचे परिक्षेत्र पाच जिल्ह्रांचे झाले. या जिल्ह्रांकरीता 1 मे, 1983 रोजी अमरावती येथे विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्र शासनाने केली. तत्कालीन विदर्भ महाविद्यालयामध्ये हे विद्यापीठ सुरु झाले. तपोवन शेजारी 470 एकराच्या भव्य परिसरात विद्यापीठरूपी वटवृक्ष आज डोलदारपणे उभा असून महाराष्ट्रातील इतर अकृषी विद्यापीठांंचा विचार करता अमरावती विद्यापीठाने केलेली प्रगती खरोखरच वाख्याणण्याजोगी आहे. विद्यापीठाच्या ज्ञानदानाच्या प्रगतीशील 40 वर्षाच्या कार्याचा छोटासा आलेख.
चाळीस वर्षापूर्वी लावलेल्या छोटयाश्या रोपटयाची आज वटवृक्षाकडे प्रगतशील वाटचाल सुरु आहे.
अमरावतीला विद्यापीठ व्हावे, यासाठी पहिला प्रशासकीय ठराव 7 ऑगस्ट, 1964 ला विधानसभेत मांडल्या गेला. तेव्हापासून चळवळ सुरु झाली. सतत वीस वर्ष अमरावती विद्यापीठाच्या निमित्तीचा प्रयत्न या भागातील जनप्रतिनिधींनी पोटतिडकीने सांसदीय आयुधांचा वापर करून विधी मंडळात लावून धरला. त्या सर्वांच्या भगिरथ प्रयत्नांचा परिपाक म्हणजे अमरावती विद्यापीठाची निर्मिती.
तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन शिक्षणमंत्री सुधाकरराव नाईक, राज्यपाल आय. एच. लतीफ, प्रतिभा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यापीठ स्थापनेचा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र शासनाने अमरावती विद्यापीठ स्थापनेबाबतचा अध्यादेश 29 एप्रिल, 1983 रोजी निर्गमित केला.
अमरावती विद्यापीठाच्या निर्मितीनंतर विद्यापीठाच्या विकासासाठी व या भागातील विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विद्यापीठातर्फे मागील चाळीस वर्षात अनेक योजना, उपक्रम, प्रकल्प, परिसर विकास, शिक्षण, संशोधन, अध्यापनाचे कार्य आठ कुलगुरूंच्या नेतृत्वात यशस्वीपणे राबविण्यात आले. त्यासाठी विविध प्राधिकारीणींच्या सदस्यांनी आजवर विद्यापीटाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान महत्वपूर्ण ठरले आहे.
विद्यापीठाची स्थापना झाली त्यावेळी संलग्न महाविद्यालयांची संख्या 67 होती, विद्यार्थी संख्या जवळपास 27 हजार व परीक्षांची संख्या 49 होती. दि. 23 नोव्हेंबर, 1990 रोजी विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळाली. चाळीस वर्षाच्या कालावधीत विद्यापीठाच्या कार्याचा आलेख प्रचंड विस्तारलेला आहे. आता विद्यापीठ परिसरात 34 पद्व्युत्तर शैक्षणिक विभाग सध्या कार्यरत असून जवळपस 2500 चे वर विद्यार्थी परिसरात शिक्षण घेत आहेत. बुलढाणा येथे मॉडेल डिग्री कॉलेज आहे. पाचही जिल्ह्रात 404 महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्नित आहेत. जवळपास पाच लक्ष विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेत असून जवळपास 700 परीक्षांचे संचालन विद्यापीठ करित आहेत.
विद्यापीठ स्थापनेपूर्वी पश्चिम विदर्भातील विद्याथ्र्यांना उच्च शिक्षणाच्या संधी पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नव्हत्या. अमरावती विद्यापीठाच्या स्थापनेमुळे पाचही जिल्ह्रांतील विद्याथ्र्यांकरीता शिक्षणाची दालने खुली झालीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी या विद्यापीठातून उच्च शिक्षित झाले, आज ते देशासह विदेशात सुद्धा कार्यरत असून भारताच्या नावलौकिकेत भर घालीत आहेत, याचा आम्हा सर्वांना मनापासून आनंद आहे. विद्यापीठाने आज चाळीस वर्ष पूर्ण केलीत, दहा वर्षानंतर हे विद्यापीठ आपल्या स्थापनेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करेल.
विद्यापीठाला आजवर स्व. डॉ. के. जी. देशमुख, डॉ. ग. व्यं. पाटील, स्व.डॉ. एस.टी. देशमुख, डॉ. सुधीर पाटील, महिला कुलगुरू डॉ.कमल सिंह, त्यानंतर डॉ. मोहन खेडकर, डॉ. मुरलीधर चांदेकर, स्व.डॉ. दिलीप मालखेडे हे कुलगुरू लाभलेत. सध्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे या विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार आहे. पाच विद्यापीठांच्या कुलगुरू पदाचा पदभार यशस्वीपणे सांभाळलेले ते बहुधा एकमेव आहेत. या सर्व कुलगुरूंची दूरदृष्टी, अभ्यास, त्याग व परिश्रम यामुळे या विद्यापीठाला आकार देतांना त्यांच्या मार्गदर्शनाचा फार मोठा लाभ मिळालेला आहे.
विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर तपोवन भागाला शासनाने जमीन अधिग्रहीत करुन दिली, ती जमीन ताब्यात घेणे, विद्यापीठ परिसराला कम्पाऊंड भिंत घालणे, मुख्य प्रशासकीय इमारती, अतिथीगृह, पद्व्युत्तर शैक्षणिक विभाग, ग्रंथालये आदींची बांधकामे त्यानंतर झालीत. विद्यापीठाचा परिसर निसर्गरम्य असावा, याकरीता सुरुवातीपासूनच नियोजन करण्यात आले. परिसरात दोन मोठे जलाशय, अनेक बंधारे बांधण्यात आले. परिसरातील पाण्याची पातळी वाढावी आणि येथील नैसर्गिक संपदा वाढावी, यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत.
या परिसरात विविध क्रीडांगणांची निर्मिती, जलकुंभाची निर्मिती, सुंदर रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा उंचच उंच झाडे डौलाने उभी आहेत. आजमितीस परिसरामध्ये सुमारे तीन लक्ष चे वर झाडे आहेत. अमरावती शहरात ऑक्सीजन पार्क म्हणून विद्यापीठ परिसराचा नावलौकिक आहे. पर्यावरण संवर्धनात विद्यापीठाने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून विद्यापीठाला महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार, स्व. अजय किनखेडे स्मृती वनराईचा वनशेती अवार्ड, इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र राष्ट्रीय पुरस्कार, वसंतराव नाईक सामाईक पुरस्कार, मुंबई आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय पर्यावरण पुरस्कार, नवी दिल्ली या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. याशिवाय उर्जा संवर्धन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्य शासनाच्या महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाचा (महाउर्जा) राज्यस्तरीय उर्जा संवर्धन पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. पर्यावरण क्षेत्रामध्ये कार्य करणाया व्यक्ती वा सामाजिक संस्थांचा गौरव म्हणून दरवर्षी पर्यावरणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाया संस्था व व्यक्तीला पर्यावरण पुरस्कार देवून विद्यापीठाकडून गौरविल्या जाते. उत्कृष्ट कार्य करणाया विद्यापीठ तथा संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य, संचालक, शिक्षक, अधिकारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना उत्कृष्ठ सेवा गौरव पुरस्कार दरवर्षी 1 मे विद्यापीठ वर्धापन दिनी देवून सन्मानीत केल्या जाते. याशिवाय नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी महाविद्यालयाला गौरविले जाते. संशोधनासाठी कल्पना चावला यंग लेडी रिसर्च अवार्ड दिल्या जातो.
संत गाडगे बाबांच्या कार्याचा सन्मान म्हणून 4 मे, 2005 रोजी महाराष्ट्र शासनाने अमरावती विद्यापीठाचे नामांतरण बाबांच्या नावाने केले. त्यांच्या विचार व कार्यानुसार हे विद्यापीठ चालावे, यासाठी सर्वजण कार्य करतात. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर उभारलेले भव्यदिव्य बाबांचे संदेशशिल्प सर्वांना दशसूत्रीतील कार्याची प्रेरणा देते. गाडगे बाबांच्या विचार व कार्यानुसार कार्य करणाया व्यक्ती व संस्थांचा सन्मान दरवर्षी कै. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृति प्रित्यर्थ श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार देवून केल्या जातो. संत गाडगे बाबांच्या विचाराचे जास्तीत जास्त अनुयायी तयार व्हावेत, समाजसेवा वृद्धींगत व्हावी हा त्यामागचा महत्तम उद्देश.
ज्ञानप्रसार
विद्यापीठ ज्ञानस्त्रोत केंद्रात 1.25 लक्ष इतके ग्रंथ असून 165 नियतकालिके आणि पाक्षिके आहेत. 13 ऑनलाईन डाटाबेस असून त्यात दहा हजारचेवर नियतकालिके समाविष्ट आहेत. ज्ञानस्त्रोत केंद्राच्या स्वतंत्र वेबसाईटवर संशोधकांकरिता माहितीस्त्रोत उपलब्ध असून त्याचा अनेक संशोधक विद्याथ्र्यांना लाभ मिळाला आहे व मिळत आहे. संलग्नित महाविद्यालयासाठी अभ्यासिकेची सुविधा केलेली असून यासंदर्भात करार केले आहेत. शहराच्या मध्यभागी रूक्मिणीनगर येथे विद्यापीठाचे निवासी ज्ञानस्त्रोत आणि संशोधन केंद्र लवकरच सुरू होत आहे.
क्रीडा
क्रीडा क्षेत्रात विद्यापीठाच्या खेळाडूंनी गेल्या चाळीस वर्षामध्ये नेत्रदिपक कामगिरी केली आहे. पश्चिम विभागीय, अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्तरावर खेळल्या गेलेल्या सर्वच क्रीडा प्रकारात खेळाडूंनी पदके प्राप्त करून विद्यापीठाचे मानांकन वाढविले आहे. वि·ा आंतर विद्यापीठ स्पर्धांसह ऑलम्पिक स्पर्धेमध्ये सुद्धा या विद्यापीठाच्या खेळाडूंचा सहभाग उल्लेखनीय राहीला आहे.
क्रीडासह सांस्कृतिक स्पर्धांमध्ये कलावंत विद्याथ्र्यांनी विद्यापीठाचा नावलौकिक देश पातळीवर पोहोचविला आहे. युवा महोत्सव, इंद्रधनुष्य, अमेध यांसारख्या स्पर्धांमध्ये कलावंत विद्याथ्र्यांनी महाराष्ट्रासह देश पातळीवर पदके व पारितोषिके मिळवून विद्यापीठाच्या नावलौकिकात भर घातली आहे. ‘आव्हान’ सारख्या स्पर्धांमुळे विद्यार्थी आपत्तकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज होत आहे, ही नक्कीच जमेची बाजू असून स्वच्छतेला महत्व देणारे कर्मयोगी श्री संत गाडगे बाबांच्या संदेशानुसार राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्वच्छतेसह राष्ट्र निर्माणामध्ये सेवा देण्याकरीता दरवर्षी तयार होतात. आजवर लाखो स्वयंसेवक तयार झाले असून त्यांनी देशाचा नावलौकिक वाढविला आहे. एन.सी.सी. मधील या विद्यापीठाच्या विद्याथ्र्यांचा सहभाग सुद्धा उल्लेखनीय आहे.
संशोधन
संशोधन कुठल्याही विद्यापीठाचा महत्वाचा भाग असतो. विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाव्दारे संशोधनावर आजवर भर दिल्या गेले आहे. तद्वतच महाविद्यालयांमध्ये सुद्धा संशोधनाचे कार्य मोठया प्रमाणावर झाले आहे. अनेक संशोधक विद्याथ्र्यांना आचार्य पदवीने गौरविण्यात आले. विद्यापीठ तसेच महाविद्यालयांतील विद्यार्थी व शिक्षकांनी संशोधनपर पेटेन्ट सुद्धा मिळविली आहेत. विद्यापीठात संशोधनाचे कार्य निरंतरपणे सुरु असून आजवर पाच हजारचे वर संशोधकांचा आचार्य पदवीने गौरव झाला आहे. या शिवाय काही संशोधकांना डी.एस्सी. ने गौरविण्यात आले आहे.
अनेक देश-विदेशातील मान्यवरांनी या विद्यापीठाला भेटी दिल्या आहेत. निसर्गरम्य परिसर पाहून त्यांचे मनमोहक होतांना दिसले. महापुरुषांचे विचार व कार्य विद्याथ्र्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी विद्यापीठात विविध अध्यासने सुरु आहेत. या अध्यासनांच्या माध्यमातून वर्षभर विविध ज्ञानवर्धक उपक्रम राबविले जातात. विद्यापीठाने आतापर्यंत सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, गांधीवादी विचारवंत समाजसेविका निर्मला देशपांडे, माजी राष्ट्रपती डॉ. व्यंकटरमण, माजी कुलगुरू थोर साहित्यिक डॉ.व्ही.बी. कोलते व सुप्रसिद्ध समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना डी.लिट देवून गौरविले आहे. विद्यापीठाच्या चाळीस वर्षाच्या विकासाच्या वाटचालीमध्ये विविध प्राधिकारिणीवर कार्य करुन व प्रत्यक्ष सहभागी होवून सन्माननीय सदस्यांचे आणि विद्यापीठातील संवैधानिक अधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे.
विद्यापीठ परिसरात 34 पद्व्युत्तर शैक्षणिक विभाग सध्या कार्यरत असून जवळपास 2500 चे वर विद्यार्थी शिक्षण घेतात. बुलढाणा येथे मॉडेल डिग्री कॉलेज आहे. पाचही जिल्ह्रात 404 महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित आहेत. जवळपास पाच लक्ष विद्यार्थी या विद्यापीठातून शिक्षण घेतात. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधून विद्याथ्र्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. महाविद्यालयांचा दर्जा सातत्याने उंचावत आहे. आजवर 171 महाविद्यालयांना नॅक मानांकन मिळाले असून त्यापैकी 32 महाविद्यालयांना ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. भविष्यात यात आणखी वाढ होईल.
विद्यापीठाच्या चाळीस वर्षीय वटवृक्षाने विकासाचे डौलदार रुप धारण केले आहे. दशकानंतर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे होईल. ज्या आशा-अपेक्षाने विद्यापीठ स्थापन झाले होते, ती पूर्ण झाल्याचा आनंद आम्हा सर्वांना आहे. भविष्यात मेळघाटासह दुर्गम भागातील फस्र्ट लर्नर पर्यंत उच्च शिक्षणाच्या कक्षा अधिक रुंदावण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. उच्च शिक्षणातील जी.ई.आर. वाढविण्यामध्ये या विद्यापीठाचे योगदान निश्चितच मोलाचे असणार आहे. पाचही जिल्ह्रांतील महाविद्यालयांच्या रुपाने मिळणारी मोलाची साथ या विद्यापीठाची बलस्थाने आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण देण्याची जबाबदारी विद्यापीठ समर्थपणे सांभाळेल आणि आमच्या विद्याथ्र्याला एक नवी दिशा मिळेल. कौशल्याधिष्ठीत विद्यार्थी घडेल असाही आम्हाला विश्र्वा्स आहे. संत गाडगे बाबांचा वारसा लाभलेले पश्चिम विदर्भातील हे विद्यापीठ जगाच्या नकाशावर ओळखल्या जाईल, हीच चाळीस वर्षपूर्ती निमित्ताने अपेक्षा. महाराष्ट्र राज्य स्थापना दिन, विद्यापीठ वर्धापन दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा।