गडचिरोली :- महात्मा गांधी आर्ट्स, सायन्स आणि स्व. नसरुद्दीनभाई पंजवानी वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात ३५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना कौशल्य विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विविध नामांकित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आणि प्राथमिक स्तरावर ३५ विद्यार्थ्यांची निवड केली.
या प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे, कौशल्य विकास अधिकारी शशिकांत गुंजाळ, शबरी आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी काळबांडे, मन्सूर सृष्टी चंद्रपूरचे शाखा व्यवस्थापक राहुल लोखंडे, हल्दीराम कंपनीचे नागपूर प्रतिनिधी किशोर रामटेके, एलआयसी गडचिरोलीचे विकास अधिकारी आणि इंट्रो मल्टी सर्विसेसचे प्रतिनिधी उत्तम जनबंधू आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्याचे प्रास्ताविक योगेंद्र शेंडे यांनी केले, तर संचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. किशोर वासुरके यांनी केले. या रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनात यंग प्रोफेशनल प्रियांका इडपात्रे आणि महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.