६०४ लाभार्थ्यांनी घेतला रुपये २० हजार कर्जाचा लाभ,
१४ लाभार्थ्यांनी घेतला ५०,०००/- हजार कर्जाचा लाभ
पथविक्रेत्यांसाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा
चंद्रपूर :- प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना ( पीएम स्वनिधी योजना) अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये कर्जाचा लाभ आतापर्यंत ३४१६ लाभार्थ्यांनी घेतला आहे. यातील ६०४ लाभार्थ्यांनी कर्ज परत करून रुपये २० हजार रुपये कर्जाचा लाभ घेतला असुन १४ लाभार्थ्यांना ५०,००० रुपयांचे कर्ज प्राप्त झाले आहे.
चंद्रपूर महानगरपालिका येथे यासंदर्भात आढावा बैठक आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली २३ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेली होती.मनपाच्या वतीने स्वनिधी से समृद्धी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता महानगरपालिका स्तरावर सनियंत्रण समिती तसेच राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान योजेनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता शहर कार्यकारी समिती गठीत करण्यात आली असुन दोन्ही समित्यांची सभा घेण्यात येऊन पथविक्रेत्यांसाठी केंद्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.
स्वनिधी से समृद्धी योजने अंतर्गत कर्ज घेतलेल्या पथविक्रेत्यांना शासनाच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,प्रधानमंत्री जन धन योजना, इमारत व इतर बांधकाम नोंदणीकरण,प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना,एक राष्ट्र एक राशन कार्ड,जननी सुरक्षा योजना,प्रधानमंत्री मातृवंदन योजना या सर्व योजनांचा लाभ मोबाईल ॲपद्वारे सर्वेक्षण करून देण्यात येणार आहे.
पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायाकरीता एका वर्षासाठी विनातारण कर्ज रु.१०,०००/- राष्ट्रीयकृत बँक मार्फत देण्यात येते. जे पथविक्रेते नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना बँकेकडून २० हजारांचे अतिरीक्त कर्ज उपलब्ध केले जाते.चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत ही योजना कार्यान्वित असून या योजनेच्या लाभाकरीता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु आहे. याप्रसंगी उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त विद्या पाटील, चंद्रपूर जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक प्रशांत धोंगळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बानाईत,कामगार विभाग अधिकारी विवेक हेडाऊ,स्टेट बँक ऑफ इंडीया मुख्य प्रबंधक पंकज चिखले, सहायक आयुक्त कौशल्य विकास भैयाजी येरमे,प्रशासन अधिकारी शिक्षण नागेश नित,समाजकल्याण अधिकारी सचिन माकोडे,शहर अभियान व्यवस्थापक रफीक शेख,रोशनी तपासे, चिंतेश्वर मेश्राम,खडसे,लोणारे,मुन,करमरकर उपस्थीत होते.