अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी 32.42 कोटी मंजूर

– क्षतिग्रस्त नदी, नाले, पूल, रस्त्यांसाठी 234.21 कोटी

– 266.63 कोटी रुपयांत पूर्ण करणार सर्व कामे

– नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नागपूर :- नागपूर शहरात 22 सप्टेंबर 2023 रोजी आलेल्या ढगफुटीसदृश्य पावसानंतर भविष्यात पुन्हा इतका पाऊस झाल्यास नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी 32.42 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून याशिवाय, क्षतिग्रस्त नदी, नाले, पूल आणि रस्त्यांसाठी 234.21 कोटी रुपयांच्या आराखड्याला राज्य सरकार मंजुरी देणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

या प्रकल्पाच्या अद्यावतीकरणासाठी एकूण 266.63 कोटी रुपयांच्या कामांचा तपशील त्यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबतच्या संयुक्त पत्रपरिषदेत जाहीर केला.

मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी,जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 22 सप्टेंबर रोजी अवघ्या 4 तासात 112 मि.मी. पाऊस झाला होता. अतिवृष्टी आणि पुरामुळे नागरिकांचे नुकसान झाले. त्यासाठीची तातडीची मदत देण्यात आली आहे. पण, नागनदी, पिवळी नदीच्या भिंती फुटल्या. हा पाऊस इतक्या वर्षांत प्रथमच झालेला असला तरी पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये, म्हणून काही निर्णय घेण्यात आले आहेत. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सातत्याने बैठका घेतल्या आणि मी सुद्धा काही बैठकांना उपस्थित होतो. त्यातून अनेक उपाययोजना निश्चित करण्यात आल्या.

दीडशे वर्ष जुने धरण असलेल्या अंबाझरी धरणाचे बळकटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यात जीर्ण भींतींचे काँक्रिटीकरण आणि सुरक्षिततेसाठी 21.07 कोटी, तर माती धरण दुरुस्ती, दगडी पिचिंग, खाली एक ड्रेन इत्यादी कामांसाठी 11.35 कोटी रुपयांचा समावेश आहे. याशिवाय, महापालिकेने राज्य सरकारकडे 234.21 कोटी रुपयांचा एक प्रकल्प अहवाल सादर केला असून, क्षतिग्रस्त नदी, नाले बांधकाम, पूल, रस्त्यांचे काम आदी कामे तातडीने हाती घेण्यात येतील. अंबाझरी ते पंचशील चौकापर्यंत सुमारे 5 कि.मी.चे अंतर असलेल्या नदीचे खोलीकरण करण्यात येऊन त्यातून गाळ काढण्यात येईल, यामुळे पाण्याची क्षमता वाढेल.

नासुप्रच्या स्केटिंग रिंग पार्किंगमुळे पाणी अडल्याची घटना सुद्धा घडली आहे. त्यामुळे हे पार्किंग मोकळे करुन तेथील प्रवाह सुरळीत होण्यासाठी पार्किंग पिल्लर काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.हिंगणा एमआयडीसी हा अंबाझरीचा ग्राहक होऊ शकतो. त्यामुळे त्याचीही शक्यता पडताळून पाहण्यास सांगण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री गडकरी म्हणाले, पंचशील चौकापर्यंतची सर्व पुलांची कामे यात करण्यात येतील. अंबाझरीच्या पाण्याचे शुद्धीकरण करुन काही भागात देण्याचा सुद्धा विचार सुरु आहे. जायकाच्या मदतीने 2400 कोटींचा नागनदीचा प्रकल्प मंजूर झाला आहे. यात तीन विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत, त्यात उर्वरित तीन मतदारसंघ समाविष्ट करण्यात येतील आणि ड्रेनेजचा इंडिग्रेटेड प्लान तयार करण्यात येईल. नागनदीच्या भोवती झालेले अतिक्रमण काढण्यात येईल.

विविध प्रकल्पांचे सादरीकरण

या पत्रकार परिषदेनंतर नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास आणि जिल्हाप्रशासनाच्या प्रस्तावित विविध प्रकल्पाबाबत गडकरी आणि फडणवीस यांच्या समक्ष, गडकरी यांच्या निवासस्थानी सादरीकरण करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार  - पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Sun Nov 5 , 2023
मुंबई :-  कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या विविध अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या समस्याबाबत नुकतीच बैठक पार पडली. त्यावेळी मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी शेतकरी नेते पाशा पटेल, रघुनाथ दादा पाटील, इंद्रीस नायकवाडी यांच्यासह विविध कुक्कुटपालन सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!