– मनपा राबविणार विशेष अभियान
– दहाही झोनच्या कार्यकारी अभियंत्यांना आयुक्तांचे निर्देश
नागपूर :- नागपूर शहरातील रस्त्यांच्या कडेला तसेच फूटपाथवर असलेल्या झाडांना जीवनदान देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार शहरातील रस्त्यालगतची व फुटपाथवरील सिमेंट काँक्रीटच्या विळख्यात असलेली झाडे मोकळी करण्यासाठी मनपा विशेष अभियान राबविणार आहे. मनपाच्या या अभियानामुळे शहरातील सुमारे ३१०० झाडे मोकळा श्वास घेणार आहेत.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये सोमवारी (ता.१७) मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, उपायुक्त विजया बनकर, डॉ. रंजना लाडे, विजय देशमुख, मिलिंद मेश्राम, प्रकाश वराडे, विनोद जाधव, उपायुक्त (उद्यान) गणेश राठोड, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार व वृक्ष संवर्धक अमोल चौरपगार उपस्थित होते. तसेच दहाही झोनचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत शहरातील रस्त्यांच्या कडेला तसेच फूटपाथवर असलेल्या झाडांची गणना करण्यात आली आहे. यात शहरातील २२९ रस्त्यांवर ३१०० झाडांचा समावेश आहे. यात सर्वाधिक झाडे नेहरूनगर झोनमध्ये असून या झोनमधील २१ रस्त्यांवर ६२९ झाडे आहेत. यानंतर मंगळवारी झोनमध्ये ४० रस्त्यांवर ५८१ झाडे आहेत. तसेच धंतोली झोनमधील २१ रस्त्यांवर ५१३ झाडे रस्त्यांच्या कडेला किंवा फूटपाथवर आहेत. या झाडांना फूटपाथवरील सिमेंट क्रांकीटीकरणामुळे धोका निर्माण झाला आहे. या झाडांना पुरेसे पाणी मिळावे तसेच मुळे हवेशीर राहावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. सिमेंट क्रांकीट व सिमेंटच्या ब्लॉकमुळे बंदिस्त झालेली झाडे मोकळी केली जाणार आहे. यामुळे या झाडांना पाणी व हवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केली आहे.
शहरातील झाडांना जीवनदान देण्याची योजना आखण्यावर भर दिला जाणार आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या बुंध्यापासून काही अंतरावर सिमेंटचे ब्लॉकचे आळे तयार करून संरक्षण केले जाणार आहे. झाडांच्या मुळांना पाणी व हवा योग्य प्रमाणात मिळावी, याची काळजी घेतली जाणार आहे. यामुळे झाडांना धोका निर्माण होणार नाही. यामुळे शहरातील या ३१०० झाडांना जीवनदान मिळेल. याशिवाय बैठकीत झाडांच्या संरक्षणासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा करण्यात आली. झाडांची निगा राखण्याठी विविध उपायांवर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच शहरातील इतर संस्थांच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवर असलेल्या झाडांची माहिती घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे यासाठी विशेष डिजाईन तयार करण्यात येणार आहे. यात नागपूर सुधार प्रन्यास व सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांचा समावेश आहे.