मुंबई :- सौर कृषी पंप योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक असून, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत असून या अंतर्गत शेतकऱ्यांना ७.५ हॉर्सपॉवर (एचपी) पर्यंतच्या पंपांसाठी ९०% सबसिडी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या योजनेसाठी एससी/एसटी शेतकऱ्यांसाठी फक्त ५% व इतरांसाठी १०% हिस्सा भरावा लागतो. या योजनेंतर्गत महाराष्ट्रात मागील एका वर्षात दोन लाख 72 हजार 422 सौर कृषी पंप बसवण्यात आले असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे, सदस्य सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास राज्यमंत्री बोर्डीकर यांनी उत्तर दिले.
शेतकरी सातत्याने ७.५ एचपी पेक्षा जास्त क्षमतेच्या पंपांसाठी सबसिडीची मागणी करत आहेत. यावर ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, मोठ्या पंपांसाठी सबसिडी उपलब्ध नाही, मात्र त्या संदर्भात सकारात्मक विचार केला जाईल. तसेच, 3 एचपी पेक्षा जास्त क्षमतेच्या पंपांसाठी बूस्टर पंपाचा पर्याय देण्यात येत आहे. परंतु बूस्टर पंपांसाठी सबसिडी सध्या उपलब्ध नसल्याने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
राज्य आणि केंद्र सरकारच्या या योजनेत प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा योजना (पीएम कुसुम) आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी योजना यांचा समावेश आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही परवडणाऱ्या दरात ऊर्जा उपलब्ध होत आहे. नदी पात्राजवळील शेतकऱ्यांना पाणी पोहोचवण्यासाठी बूस्टर पंपाचा उपयोग कसा करता येईल, यासाठीही काही प्रात्यक्षिके करण्यात आली असून ती यशस्वी ठरली असल्याचेही राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समस्या समजून घेऊन उपाययोजना करण्यात योतील. त्याचप्रमाणे, थकीत वीज बिलधारकांसाठी “अभय योजना” राबवली जात असून या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज पुरवठा पूर्ववत करता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.