नागपूर, दि. 24 : युवांनी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी जिल्हास्तरावर युवा पुरस्कार देण्यात येतो. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर द्वारा नागपूर जिल्ह्यात युवकांच्या सर्वांगीण विकासाकरिता स्वयंस्फूर्तीने कार्य करणारे 15 ते 29 वयोगटातील युवक, युवतींची व संस्थांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरूप युवक/युवतींसाठी रोख रु. 10,000/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तसेच संस्थांसाठी रोख रु. 50,000/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.
जिल्हा युवा पुरस्कार निवड समितीद्वारे वर्षनिहाय निवड करण्यात आलेले सन 2019-20 चे पुरस्कारार्थी युवक गटात जयंत जयप्रकाश दुबळे, हनुमाननगर, नागपूर ; युवती गटात कल्याणी ज्ञानेश्वर गजभिये, बिनाकी, नागपूर व सन 2020-21 चे पुरस्कारार्थी युवक गटात मोनिश महेश अठ्ठरकर, उमरेड, नागपूर ; युवती गटात युक्ती मधुकरजी बेहनिया, काटोल, नागपूर ; संस्था गटात नयन बहुद्देशीय महिला विकास व तांत्रीक शिक्षण संस्था, सेमिनरी हिल्स, नागपूर असे आहेत.
निवड झालेल्या सर्व पुरस्कारार्थीना 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रसंगी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या शुभहस्ते पुरस्कार दिला जाणार आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सर्व पुरस्कारार्थीना शुभेच्छा दिल्या आहेत.