‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाद्वारे २५ हजारावर महिला लाभान्वित

नवरात्र कालावधीत मनपाद्वारे अभियानाची अंमलबजावणी

नागपूर :- महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे नवरात्रीच्या अनुषंगाने २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे विशेष अभियान राबविण्यात आले. १८ वर्षावरील महिलांच्या तपासणीबाबत महत्वपूर्ण अभियानाची नागपूर महानगरपालिकेद्वारे व्यापक प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार शहरातील विविध भागात महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी अभियान राबविण्यात आले. यामधून एकूण २५ हजारावर महिलांनी लाभ घेतला.नागपूर महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून १८ वर्ष वयोगटातील एकूण २५२७८ महिलांची तपासणी करण्यात आली. यात २१५६३ महिला लाभार्थ्यांची रक्तदाब तपासणी करण्यात आली आहे. ६६२ महिला लाभार्थ्यांचे छातीचे एक्सरे काढण्यात आले. ७३१ महिलांची दंत तपासणी करण्यात आली. असंसर्गजन्य आजाराची ३५ वर्ष वयोगटातील १४००४ स्त्रीयांची तपासणी, ५३३ गर्भवर्तीचे टीडी लसीकरण, १५३ महिलांची सोनोग्राफी तपासणी करण्यात आली, असल्याची माहिती वैद्यकिय आरोग्य अधिकारी, मनपा, डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी दिली.

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेतील १० झोन अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत विविध ठिकाणी महिला आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील १८ वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण आरोग्य मनपाच्या दहाही झोनमध्ये एकूण ३४ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यानिमित्त पाचपावली सूतिकागृह येथून या अभियानाचा शुभारंभ झाला. या शिबिरांमध्ये स्त्रियांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली शिवाय कॅन्सर स्क्रिनींग करून त्यांचे समुपदेशन सुद्धा करण्यात आले.

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानांतर्गत विशेष आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आले. यात महिला व मातांची वैदयकीय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करण्यात आली. त्यांचे वजन व उंची घेवून बीएमआय काढणे (सर्व स्तरावर) हिमोग्लोबिन, युरिन एक्झामिनेशन, ब्लड शुगर, (सर्व स्तरावर ग्रामपातळीपासून), प्रत्येक स्तरावर एचएलएल मार्फत व संस्था स्तरावर उपलब्ध सर्व रक्त तपासण्या युरिन एक्झामिनेशन, ब्लड शुगर (आवश्यकतेनुसार व महिलांच्या वयोगटानुसार) केल्या जाणार आहेत. याशिवाय चेस्ट एक्स रे, कर्करोग स्क्रिनिंग, रक्तदाब स्क्रिनिंग, मधुमेह स्क्रिनिंग (३० वर्षावरील सर्व महिला), आरटीआय-एसटीआय ची तपासणी, माता व बालकांचे लसीकरण करण्यात आले.

मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांच्या नेतृत्वातील आरोग्य चमूने उत्कृष्ट कार्य करून अभियानाच्या यशस्वीतेसाठी महत्वाचे योगदान दिले.

मनपाच्या ३४ आरोग्य केंद्रांमध्ये शिबिरे

नागपूर महानगरपालिकेद्वारे दहाही झोनमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त महिला, मातांची तपासणी व्हावी, याकडे आयुक्तांमार्फत विशेष लक्ष देण्यात आले. लक्ष्मीनगर झोन मध्ये जामठा यूपीएचसी, सोमलवाडा यूपीएचसी आणि फुटाळा यूपीएचसी, तर धरमपेठ झोनमध्ये हजारीपहाड यूपीएचसी, तेलंगखेडी यूपीएचसी आणि के.टी. नगर यूपीएचसी, हनुमाननगर झोनमध्ये नरसाळा आणि मानेवाडा यूपीएचसी, धंतोली झोनमधील बाबुलखेडा यूपीएचसी, कॉटन मार्केट यूपीएचसी आणि नंदनवन यूपीएचसी, नेहरूनगर झोनमधील बेबीपेठ यूपीएचसी, ताजबाग एचपी, दिघोरी एचपी, गांधीबाग झोनमध्ये मोमीनपुरा, भादलपुरा आणि शांतीनगर यूपीएचसी, संतरजीपुरा झोनमध्ये मेहंदीबाग, जागनाथ बुधवारी आणि सतरंजीपुरा यूपीएचसी, लकडगंज झोनमधील डिप्टी सिग्नल, पारडी, विजयनगर (भरतवाडा) आणि हिवरीनगर यूपीएचसी, आशीनगर झोनमध्ये कपीलनगर, पाचपावली, शेंडेनगर, गरीबनवाज यूपीएचसी आणि बंदेनवाज एचपी तर मंगळवारी झोनमधील झिंगाबाई टाकळी, इंदोरा, गोरेवाडा आणि नारा यूपीएचसी येथे शिबिर घेण्यात आले. याशिवाय मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सूतिकागृह आणि आयसोलेशन हॉस्पीटल येथेही या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिरामध्ये स्त्रीरोग तज्ञांकडून गरोदर माता, जननक्षम वयोगटातील १८ वर्षावरील सर्व महिलांची तपासणी, ३० वर्षावरील सर्व महिलांचे एन.सी.डी. स्क्रिनिंग (उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, बी.एम.आय. ब्लड शुगर), सर्व वयोगटातील स्त्रीयांची रक्तगट तपासणी, TD चे लसीकरण, सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, कॅन्सर स्क्रिनिंग, पोषण, स्तनपान, अतिजोखमीच्या प्रसुतीकरीता योग्य मार्गदर्शन व समुपदेशन व तपासणी, किशोरवयीन मुलींमधील फॉलिक अॅसिड, जंतनाशक औषधाच्या माध्यमातून रक्तक्षय प्रतिबंधित करणे, सिकलसेल तपासणी आणि थॅलेसिमीयाबाबत मार्गदर्शन, मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत स्त्रिरोग तज्ञाकडून अतिजोखमीच्या गरोदर मातांची तपासणी व सोनोग्राफी, दंतरोग निदान शिबिर, नेत्र तपासणी, क्षयरोग, चेस्ट ए-क्सरे, कुष्ठरोग तपासणी, कुटुंब नियोजन कार्यक्रमाअंतर्गत शिबिर, गर्भसंस्कार शिबिर, मानसिक रोग तपासणी, माता-बालक यांचे कोविड व सर्व प्रकारचे लसीकरण, जननी सुरक्षा योजना आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनांचा लाभ, व्यसनमुक्ती मार्गदर्शन, रक्तदान शिबिर आदी सुविधा प्रदान करण्यात आल्या.

अभियानाला महिनाभराची मुदतवाढ

नवरात्रीचे औचित्य साधून राज्य शासनाद्वारे राबविण्यात आलेल्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या अभियानाचा अनेक महिलांनी लाभ घेतला. राज्यातील जास्तीत जास्त महिलांनी शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासण्या करून घ्यावी यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाद्वारे या अभियानाला मुदतवाढ देण्यात आली आहे. ५ ऑक्टोबर पर्यंत असलेले हे अभियान आता पुढे महिनाभर सुरू राहणार आहे. अभियानाच्या मुदतवाढीमुळे नागपूर शहरातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळेल, असा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सिल्व्हर ओकवर हल्ला कुणी करायला लावला होता हे त्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेतल्याने स्पष्ट झाले - जयंत पाटील

Mon Oct 10 , 2022
चंद्रकांत पाटील यांनी मोदी – शहांची तुलना आई-वडिलांशी करणे हे हिंदू संस्कृतीत बसत नाही, हे अत्यंत चुकीचे… मुंबई :- ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकवर हल्ला केला ‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले गेले याचा अर्थ सिल्व्हर ओकवर जाण्यासाठी त्यांना कुणी फुस लावली होती हे लक्षात येते असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com