नागपूर :- कुही तालुक्यातील अंभोरा पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी 248 कोटींच्या आराखड्यास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यापैकी 74 कोटी 40 लाखांचा निधी वितरीत करण्यात मान्यता दिली.
अंभोरा येथे राज्यातून अनेक भावीक व पर्यटक भेट देत असतात. या पर्यटन स्थळी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत होती. त्यामुळे शासनाने या पर्यटनस्थळाच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता दिली आहे. 248 कोटी किंमतीच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येवून 30 टक्के मर्यादेपर्यंत 74 कोटी 40 लाखाचा निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने शासननिर्णय निर्गमित केला आहे.
अंभोरा पर्यटन विकासांतर्गत आराखड्याची अंमलबजावणी दोन टप्प्यात करण्यात येणार असून नैसर्गिक सौदर्यास बाधा न आणता काँक्रीट अथवा दगडांचा कमीत कमी वापर करण्यात येणार आहे. गोसीखूर्द जलपर्यटन प्रकल्प व अंभोरा पर्यटन विकासातील जलपर्यटन विकास कामे सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीतून (पीपीपी) होणार आहे.