मुंबई :- मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सन 2024 -25 मध्ये राबविण्याकरिता 24 कोटी 74 लाख 82 हजार रुपये एवढा निधी कृषी आयुक्त यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे.
राज्यातील अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देणे, शेतमालाचे मूल्यवर्धन करणे करिता शेतकऱ्यांचे सहभागाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन देणे,उत्पादित अन्न पदार्थाच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, ऊर्जेची बचत व्हावी, यासाठीच्या प्रकल्पांच्या आधुनिकीकरणास प्रोत्साहन देणे याउद्दिष्टांसह शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना ही शंभर टक्के राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली आहे.
त्यानुषंगाने मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी सन 2024 -25 च्या अर्थ संकल्पामध्ये 75 कोटी रुपये एवढ्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे.