शाश्वत खाणकाम आणि वाढत्या उप्तादनाची कोळसा मंत्रालयाकडून सुनिश्चिती
नवी दिल्ली :-भारताच्या एकूण देशांतर्गत कोळसा उत्पादनाने आर्थिक वर्ष 2018-2019 मधील 728.72 दशलक्ष टन च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 893.08 दशलक्ष टन म्हणजेच 22.6% इतकी प्रभावी वाढ दर्शविली आहे. कोळसा आयातीवरील अवलंबित्व रोखण्यासाठी पर्याय म्हणून देशांतर्गत कोळसा उत्पादनाला चालना द्यायला मंत्रालयाचे प्राधान्य आहे. आर्थिक वर्ष 2018-2019 मध्ये 606.89 दशलक्ष टन असलेले कोल इंडिया लिमिटेड (CIL) चे कोळसा उत्पादन गेल्या 5 वर्षांमध्ये,15.9% वाढीसह 703.21 MT (दशलक्ष टन) वर गेले आहे.
एस सी सी एल ने आर्थिक वर्ष 2018-19 मधील 64.40 दशलक्ष टन वरून आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 4.3% वाढीसह 67.14 दशलक्ष टन इतकी प्रभावी वाढ दर्शवली आहे. कंपन्यांच्या मालकीच्या खाणी आणि इतर खाणींनी देखील कोळसा उत्पादनात आर्थिक वर्ष 2018-19 मधील 57.43 दशलक्ष टन वरून आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 113.7% च्या वाढीसह 122.72 दशलक्ष टन इतकी झेप घेतली आहे.
कोळशाला सर्व क्षेत्रातून असणाऱ्या मागणीची पूर्तता करण्यासाठी तसेच औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा असावा याकरता आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण होण्याच्या उद्देशाने देशांतर्गत कोळसा उप्तादन वाढवण्यासाठी कोळसा मंत्रालयाने अनेक उपाययोजना सुरु केल्या आहेत. कोळसा उत्पादनातील या अतुलनीय वृद्धीमुळे देशाला ऊर्जा सुरक्षा प्रदान करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. आर्थिक वर्ष 2023-2024 साठी निर्धारित वार्षिक कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट 1012 दशलक्ष टन आहे.
याव्यतिरिक्त शाश्वत विकास उद्दीष्टे साध्य करण्यासाठी, कोळसा मंत्रालय, पर्यावरण सुरक्षा, साधनसंपत्तीचे संवर्धन, सामाजिक कल्याण तसेच आपली वने आणि जैवविविधता यांचे जतन करण्याच्या कार्यात सक्रियपणे सहभागी आहे. खाणींमधील कोळशाची रस्ते वाहतूक टाळण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन विकसित करण्याकरता मंत्रालयाने धोरण तयार केले आहे आणि फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी (एफएमसी) प्रकल्पांतर्गत यांत्रिक कोळसा वाहतूक आणि लोडिंग सिस्टम अद्ययावत करण्यासाठी पावले उचलली आहेत.