राज्यपालांच्या उपस्थितीत एशियाटिक सोसायटीचा 219 वा वर्धापन दिवस संपन्न

-“वाचन सुलभता वाढविण्यासाठी अधिकाधिक पुस्तकांचे डिजिटायझेशन करावे” : राज्यपाल रमेश बैस

मुंबई :- नवी पिढी वाचनापासून दूर जात आहे, हा चुकीचा समज आहे. डिजिटल माध्यमे आल्यामुळे नवी पिढी वाचन सुलभता शोधत आहे. ‘व्यापार सुलभते’प्रमाणेच वाचकांना वाचन सुलभता हवी आहे. ग्रंथ वाचन बंद झाले नाही तर वाचण्याची पद्धत बदलली आहे. त्यामुळे ग्रंथालयांनी अधिकाधिक पुस्तकांचे डिजिटलायझेशन करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

मुंबईचे सांस्कृतिक वैभव असलेल्या एशियाटिक सोसायटीचा 219 वा वर्धापन दिवस राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

लाखो दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते, नाणी व नकाशांचा संग्रह असलेली एशियाटिक सोसायटी आपल्या अस्तित्वासाठी लढताना दिसत आहे. परंतु मुंबई हे दानशूर लोकांचे शहर आहे. मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून शेकडो अशासकीय संस्था आपल्या सेवाभावी कार्यांसाठी मुंबईतून निधी संकलन करीत असतात. त्यामुळे निधीची कमी नाही, तर योग्य व्यक्तींकडे योग्य प्रस्तावासह पोहोचणे आवश्यक असल्याचे राज्यपाल बैस यांनी यावेळी सांगितले.

एशियाटिक सोसायटीने राज्यातील सर्व विद्यापीठांसोबत काम करावे, आपल्या भव्य जागेची पुनर्रआखणी करावी व युवा वाचकांना साहित्य उपलब्ध करुन द्यावे, जगातील मोठमोठी ग्रंथालये स्वतःला कसे बदलत आहेत याचे अध्ययन करुन आपण त्यानुसार बदल करावे तसेच युवा पिढीला व कॉर्पोरेट सदस्यांना व्यवस्थापनात घ्यावे अशा सूचनाही राज्यपालांनी यावेळी केल्या.

एशियाटिक सोसायटीला अध्यक्ष म्हणून इतिहासकार, लेखक व संपादकांची परंपरा लाभली आहे. सोसायटीने स्वतःचा वार्षिक साहित्य उत्सव निर्माण करावा. संगीत समारोहाचे देखील आयोजन करावे. अनेक देश आज आपल्या देशातील ऐतिहासिक वारशाच्या माध्यमातून पैसे कमवत आहेत. एशियाटिक सोसायटीने आपले कार्य सुरु ठेवण्यासाठी आपले स्थापत्य व ग्रंथ वैभव जगापुढे आणावे अशी सूचना राज्यपालांनी केली.

यावेळी डॉ सरयू दोशी (भारतीय कला, इतिहास व संस्कृती), डॉ अनुरा मानातुंगा (लेखक व क्युरेटर । कला इतिहास), प्रो. नोबुयोशी नामाबे (बुद्धिस्ट स्टडीज), प्रो गोपाल कृष्ण कान्हेरे (रौप्य पदक) व प्रो. ब्रजकिशोर स्वैन (धर्मशास्त्र – महामहोपाध्याय डॉ पां. वा. काणे सुवर्ण पदक) यांना राज्यपालांच्या हस्ते संस्थेची फेलोशिप व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. संगीतकार झुबीन मेहता, प्रो उपिंदर सिंग व प्रो सुभाष चंद्र मलिक उपस्थित राहू शकले नाहीत.

एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष विस्पी बालापोरिया यांनी प्रास्ताविक केले तर मानद सचिव मंगला सरदेशपांडे यांनी आभार मानले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे महासंचालक डॉ. सब्यसाची मुखर्जी, सोसायटीच्या उपाध्यक्ष शहरनाज नलवाला, डॉ फरोख उदवाडिया आदी मान्यवर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शहरातील विविध विकास कामांची पाहणी

Sun Nov 26 , 2023
– एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन आराखडे तयार करा- अजित पवार पुणे :-  प्रशासकीय इमारतीचे आराखडे करतांना आगामी 50 वर्षाचा सर्वांगीण विचार करता एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन इमारतीचे आराखडे तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी दौऱ्याच्यावेळी दिले.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com