– गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
– मनपाची ८ पथके कार्यरत
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर धडक कारवाई सुरूच असुन उपद्रव शोध पथकाद्वारे शहरात २ जागी कारवाई करून सुमारे २ हजार ६० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
बंदी असलेल्या व एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार ८ टीम्स बनविण्यात आल्या आहेत. या सर्व चमूंनी काल शहरात एकाच वेळी कारवाई सुरु केली. यात पठाणपुरा येथील वाडी गोल्ड ट्रान्सपोर्ट तसेच बिनबा गेट येथील कुमार ट्रान्सपोर्ट या दोन्ही गोडाऊनवर संध्याकाळच्या सुमारास उपायुक्त रवींद्र भेलावे व सहायक आयुक्त अक्षय गडलिंग यांच्या वेगवेगळ्या चमुने धाड टाकत वाडी गोल्ड ट्रान्सपोर्ट येथुन २ हजार १० किलो तर कुमार ट्रान्सपोर्ट येथुन ५० किलो असे एकुण २ हजार ६० किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त केले.
यावेळेस सुद्धा या गोडाऊन संबंधी गुप्त माहिती मनपास प्राप्त झाली होती. प्लास्टीक साठा,पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येत असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास ५ हजारांचे बक्षिस दिल्या जात असल्याने अनेक सुजाण व्यक्तींकडुन अवैध साठ्यासंबंधी तक्रारी मनपास प्राप्त होत आहेत.
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.
सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रवींद्र भेलावे व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त अक्षय गडलिंग,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, डॉ. अमोल शेळके,राहुल पंचबुद्धे,स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, जगदीश शेंद्रे,मनीष शुक्ला,अनिल खोटे, भरत बिरिया,डोमा रंगारी, बंडू चहारे, विक्रम महातव,डोमा विजयकर,अमरदीप साखरकर यांनी केली.