– दोन ऐवजदारांचे कार्ड रद्द
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या झोन कार्यालयांमध्ये कार्यरत १९ कामचुकार, बेशिस्त, सतत गैरहजर राहणा-या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करीत मनपाद्वारे या कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन ऐवजदार सफाई कामगारांचे ऐवजी कार्ड देखील रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी १९ सफाई कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश निर्गमित केले आहेत.
मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे विविध झोन कार्यालयांद्वारे कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा, कामावर गैरहजर राहणे तसेच कामचुकारपणा केला जात असल्याबाबत प्रस्ताव प्राप्त झाले होते. विभागाद्वारे चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. काही कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी देखील सुरू आहे. १९ निलंबित सफाई कर्मचाऱ्यांमध्ये धरमपेठ झोनमधील ६, गांधीबाग झोनमधील ३, नेहरूनगर, लकडगंज आणि मंगळवारी झोनमधील प्रत्येकी २ तसेच लक्ष्मीनगर, हनुमान नगर आणि धंतोली झोन मधील प्रत्येकी १ सफाई कामगारांचा समावेश आहे. सतरंजीपुरा झोनचे ऐवजदार सफाई कामगार प्रमोद शेंडे आणि मंगळवारी झोनचे रोशन मस्त यांचे ऐवजी कार्ड रद्द करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम क्रमांक ८ नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात आली
निलंबित सफाई कर्मचारी
शिस्तभंगाची कार्यवाही करीत मनपाद्वारे निलंबित करण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांमध्ये तुषार पप्पू बिरहा, अलोक जावणे, धर्मेंद्र वासनिक, तुकाराम डागोर, कृष्णा ब्राम्हणकर, किशोर सोनोने, अनिल हुमणे, संतोष मोटघरे, सुकांत शिर्के, संदीप बनसोड, राहुल मोगरीया, सुनील कैथेल, कुणाल तांबे, रामू बक्सरे, अमित गोंडाणे, अभिजीत बोरकर, पुंडलिक गुडधे, सुभाष ढोबळे, आणि कमलेश राऊत यांचा समावेश आहे.