– फडणवीस यांनी १७ महिन्यांपूर्वी आदेश दिले तरी एमटीडीसी नागरिकांसाठी उद्यान खुलं करत नाही
नागपूर :- पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आज विधानसभेत गंभीर आरोप करताना सांगितले की, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उभारणीला १७ महिन्यांचा विलंब हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) भ्रष्ट कारभारामुळे झाला आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ महिन्यांपूर्वी आदेश दिले असतानाही एमटीडीसी अंबाझरी उद्यान नागरिकांसाठी खुलं करत नाही, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे यांचा सवाल – फडणवीस यांनी आदेश दिले, मग अंमलबजावणी का नाही?
१८ ऑक्टोबर २०२३ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अंबाझरी उद्यान नागरिकांसाठी तत्काळ खुलं करण्याचे, स्मारकाचे बांधकाम राज्य सरकारच्या निधीतून करण्याचे आणि गरुडा अम्यूझमेंट्सचा करार रद्द करण्याचे आदेश दिले होते. आता फडणवीस मुख्यमंत्री असतानाही त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही, असे ठाकरे यांनी सभागृहात स्पष्ट केले.
“एमटीडीसी सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देत नाही. पीडब्ल्यूडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदारालाही कामाचा आदेश दिला आहे. मात्र, एमटीडीसीकडून NOC मिळत नसल्याने स्मारकाचे भूमिपूजन आणि प्रत्यक्ष काम रखडले आहे,” असे ठाकरे यांनी सभागृहात सांगितले.
५ वर्षांपासून अंबाझरी उद्यान जनतेसाठी बंद; गरुडा अम्यूझमेंट्सचा करार रद्द करण्याची मागणी
ठाकरे यांनी हेही निदर्शनास आणून दिले की, पाच वर्षांपासून गरुडा अम्यूझमेंट्स उद्यानावर अतिक्रमण करून बसले आहे. परिणामी, जनतेला उद्यानाचा वापर करता येत नाही. त्यांनी उद्यान तातडीने खुलं करण्याची आणि गरुडा अम्यूझमेंट्सचा करार त्वरित रद्द करण्याची मागणी केली.
“एमटीडीसी जनतेच्या नव्हे, तर गरुडा अम्यूझमेंट्सच्या फायद्यासाठी काम करत आहे” – ठाकरे
ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, एमटीडीसीने उद्यान ताब्यात घेतल्यापासून जनतेच्या हिताची कोणतीही काळजी घेतलेली नाही, उलट गरुडा अम्यूझमेंट्सला फायदा होईल अशाच योजना आखल्या जात आहेत.
“एमटीडीसी आणि गरुडा अम्यूझमेंट्स यांच्यात बार, क्लब, रेस्टॉरंट, फंक्शन लॉन उभारण्याचा डाव आहे. त्यामुळेच एमटीडीसी स्मारक आणि उद्यानाचे काम अडवून ठेवत आहे,” असा गंभीर आरोप ठाकरे यांनी केला.
४४ एकर उद्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने समर्पित करण्याची ठाकरे यांची मागणी
ठाकरे यांनी सातत्याने मागणी केली आहे की, अंबाझरी उद्यानाच्या ४४ एकर जागा परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी द्यावी.
“जनतेला न्याय मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही!” असा ठाम इशारा ठाकरे यांनी दिला आहे.