नागपूर : नागपूर शहरात बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे (NCDC) बांधकाम पुढील महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्राच्या बांधकामासाठी जमिनीचे मोजमाप झाले असून, ते चिन्हांकित करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) बांधकामाची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पथकाच्या देखरेखीखाली ही योजना पूर्ण केली जाईल.
केंद्र सरकारने देशातील ३० शहरांमध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील विविध शहरांमध्ये आठ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यानंतर आणखी ६ शहरांमध्ये अशी केंद्रे सुरू करण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. त्यात नागपूरचाही समावेश करण्यात आला आहे.
नागपूर विभागाच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या (माता कचेरी) दोन एकर जागेवर हे केंद्र बांधण्यात येणार आहे. त्यासाठी १६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत आरोग्य सेवा महासंचालकांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली एनसीडीसी काम करते.
हे केंद्र संसर्गजन्य आणि इतर रोगांचे परीक्षण, तपासणी, प्रतिबंध आणि नियंत्रण करते. हे केंद्र वैद्यकीय महाविद्यालये, आरोग्य सेवा क्षेत्रातील संशोधन संस्थांशी समन्वय साधून काम करते आणि औषध आणि इतर उपाययोजनांबाबत सल्ला देते. या केंद्रात अत्याधुनिक सुविधा असतील, त्याचा फायदा मध्य भारताला होईल.