मुंबई हल्ल्याची 15 वर्षे…2

– एकही बातमी देऊ शकलो नाही😣

मी आणि राकेश गौरीहर रात्रभर तरुण भारत कार्यालयात जागून काढल्यावर सकाळी बाहेर पडलो, तेव्हा सीएसटी चौकात आणि डी. एन. रोडवर जवळजवळ सामसूम होती. वाहनांची वर्दळ नव्हतीच. मधेमधे रस्त्याच्या कडेला असलेले मुबंईचे प्रसिद्ध उकळी चहावाले ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते. अशाच एका अड्ड्यावर चहा आणि पाव खाऊन आम्ही रात्रीचा उपवास सोडला आणि Majestic कडे कूच केले.

सीएसटी ते कुलाब्याचे हे अडीच कि. मी. चे अंतर तुडवून आम्ही रीगल सिनेमा चौकात आलो, तेव्हा चौकात मोठा बंदोबस्त आणि येणाऱ्याजाणाऱ्यांची कडक तपासणी होत होती. याच गर्दीत असताना तरुण भारतचे नागपूरचे सहकारी श्रीनिवास वैद्य यांचा फोन आला- “मी आणि अविनाश पांडे (क्राईम रिपोर्टर) मुंबईत पोहोचलो आहोत आणि Majestic ला येत आहोत.” त्यांना घेऊन आमदार निवासात जाणे महाकठिण काम होते. कारण, या परिसरातील Hotel Taj मध्ये आणि ज्यूंच्या छाबाड (नरिमन) हाऊस मध्ये दहशतवाद्यांचा धुमाकूळ सुरूच होता आणि Leopold Cafe मध्ये रात्रीच हिंसाचार घडला होता. त्यामुळे हा संपूर्ण परिसर अतिसंवेदनशील ठरवून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. पत्रकाराचे अधिस्वीकृती पत्र आणि Majestic मध्येच निवास असण्याच्या पुराव्याच्या भरोशावर मोठ्या मुश्किलीने आम्ही आत प्रवेश मिळवू शकलो. एक दिव्य पार पाडल्याचा अनुभव गाठी जमा झाला.

या क्षणापर्यंत, म्हणजे गेल्या दहा तासात हल्ल्याच्या बातमीचे एक अक्षरही मी तरुण भारतला कळवू शकलो नव्हतो. कारण, घटना सुरू झाल्यानंतर दोन-तीन तास आम्ही बोराबाजारच्या गल्लीत अनेकांसह अडकलो होतो. मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी एकालाही तेथून हलू दिले नाही. सीएसटीमधून बाहेर पडून कसाब आणि इस्माईल हिंसाचाराचे तांडव करीत कामा इस्पितळ, मेट्रो सिनेमा, विधान भवन, मरीन ड्राईव्ह मार्गे गिरगाव चौपाटी जवळ पोहोचून कसाब पकडला गेल्यानंतरच पोलिसांनी आम्हाला जाऊ दिले. कार्यालयात जाऊन टीव्हीवर लाईव्ह आणि आधीच्या बातम्यांची दृश्ये पाहणे, एवढेच काम मी करू शकलो. याची पुरेशी कल्पना असल्यामुळे तरुण भारतने टीव्ही, वृत्तसंस्था यांच्या सौजन्याने बातम्या तयार करून पहिला दिवस निभावला.

परंतु, वैद्य आणि पांडे हे दोघे आल्यानंतर 27 नोव्हेंबरच्या सकाळपासून तरुण भारतच्या स्वत:च्या वृत्तसंकलनाने वेग घेतला. जवळच असलेल्या ‘ताजमहल’कडे आम्ही तिघांनीही धाव घेतली, तेव्हा दहशतवाद्यांचे गोळीबार, जाळपोळ सुरूच होते. गेट वे ऑफ इंडिया समोरील पटांगणात अडविले गेल्यावर तेथूनच आम्ही दहशतवादाचा नंगानाच अनुभवत होतो- बंदुकीचे आवाज ऐकत होतो, आग पाहत होतो. नंतर वैद्य आणि पांडे उच्च पोलिस वर्तुळात, तर मी मंत्रालयात, असे वाटप करून आम्ही कामाला लागलो. विशेषत: अविनाश पांडे यांचा पोलिस दलात खूपच दांडगा संपर्क असल्यामुळे अनेक चांगल्या आणि मुंबईतील पत्रकारांपेक्षाही वेगळ्या बातम्या तरुण भारतच्या हाती लागल्या, हे मी अभिमानाने नोंदवू इच्छितो. असा खंदा गुन्हे वार्ताहर असलेले अविनाश पांडे नंतरच्या काळात दुर्दैवाने कर्करोगाला अल्पवयात बळी पडले, याचे आम्हा सर्वांनाच अतीव दु:ख आहे. मुंबई हल्ल्याचा उल्लेख झाला की स्व. अविनाशची आठवण आल्याशिवाय राहत नाही. (अपूर्ण, उद्याही)

रुजू होण्याआधीच वार्तांकन😊

आमच्याप्रमाणेच, मनोज वाडेकर आणि अभिजित देशमुख यांनाही 26 च्या रात्री उपवास घडला. परंतु, त्या स्थितीतच, या दहशतवादी हल्ल्याची पहिली बातमी ब्रेक करण्याचा मान अभिजितने पटकावला, त्याचा हा किस्सा.

झी 24 तास वाहिनीत इंटरव्ह्यू देण्यासाठी अभिजित देशमुख मुंबईत आले होते. 26 ला दुपारी इंटरव्ह्यू होऊन त्यांची निवडही झाली. त्या आनंदात असतानाच, रात्री त्यांच्या डोळ्यादेखत Leopold Cafe ची घटना घडली. ती त्यांनी त्वरित झी 24 तासला कळविली. आणि नंतरही बराच काळ ते Cafe आणि Taj येथील हल्ल्यांसंबंधीच्या बातम्यांचे मोबाईलवरून लाईव्ह रिपोर्टिंग करीत होते. सेवेत रुजू होण्याआधीच सेवा देणारे अनोखे पत्रकार !

पुढे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या मीडिया सेलचे काम पाहणारे अभिजित देशमुख सध्या अशोक चव्हाण यांचे जनसंपर्काचे काम पाहत आहेत.

-विनोद देशमुख

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

.....तो राष्ट्रपति के काफिले में घुस जाएंगे मवेशी, पूरे मार्ग पर आवारा पशुओं का डेरा 

Tue Nov 28 , 2023
नागपुर :- आगामी 1 दिसंबर को शहर में राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू का आगमन होना है. सुबह एयरपोर्ट से वे सीधे राजभवन जाएंगी. दोपहर को कुकड़े लेआउट में नवनिर्मित जगन्नाथ मंदिर का उद्घाटन उनके हाथों होगा. इसके बाद वे मेडिकल अस्पताल के प्रांगण में आयोजित अमृत महोत्सव कार्यक्रम में हिस्सा लेंगी. दूसरे दिन राजभवन से उन्हें सुरेश भट सभागृह में नागपुर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com