मुंबई हल्ल्याची 15 वर्षे…1

– कसाबने केलेल्या बॉम्बस्फोटाचा सीएसटीपुढेच ऐकला आवाज

आजपासून 15 वर्षांपूर्वी, 26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात अजमल कसाब आणि इस्माईल खान यांनी केलेले बॉम्बस्फोट आणि गोळीबार यांचे आवाज मी अगदी जवळून ऐकले. कारण, त्याचवेळी मी तरुण भारत कार्यालयातून निघून सीएसटी च्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पोहोचलो होतो.

हो. तरुण भारतचे मुंबई कार्यालय अगदी सीएसटी चौकात, हुतात्मा स्मारकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर (160, डी. एन. रोड) Esplanade Building मध्ये आहे. तेव्हा मी या कार्यालयाचा प्रमुख आणि तरुण भारतचा विशेष प्रतिनिधी होतो. घटनेच्या थोडाच वेळ आधी मी आणि माझा मित्र राकेश गौरीहर (हा नागपूरचा मुलगाही माझ्यासोबतच Majestic MLA Hostel मध्ये आमदार देवेन्द्र फडणवीस यांच्या रूम नं. 402 मध्ये राहत होतो.) कार्यालयातून बाहेर पडलो होतो. माझे मित्र, देशोन्नतीचे मुंबई प्रतिनिधी आणि सध्या नितीन गडकरी यांचे सहाय्यक असलेले मनोज वाडेकर, तसेच अमरावतीचे पत्रकार आणि सध्या काँग्रेसचे माध्यम सल्लागार असलेले अभिजित देशमुख हे दोघे Majestic जवळ आमची जेवणासाठी वाट पाहत होते.

आम्ही रात्री नऊच्या सुमाराला कार्यालयातून बाहेर पडलो आणि डी. एन. रोड ओलांडून सीएसटीकडे चालू लागलो. (सीएसटीच्या प्रवेशद्वारासमोरच कुलाब्याकडे जाणाऱ्या सिटी बसचा थांबा आहे.) पाहतो तो काय, रस्त्यावर लोकांची गर्दी आणि सीएसटी स्थानकातून स्फोटासारखे आवाज येताहेत. गुंडांमध्ये गोळीबार सुरू असल्याची चर्चा लोक करीत होते. त्या गर्दीतच पुढे सरकून आम्ही थांब्याजवळ पोचलो, तेव्हा खूप मोठा आवाज आला. (स्थानकात गर्दी करून बसलेल्या प्रवाशांवर अजमल कसाबने Hand Grenade फेकला, हे नंतर टीव्हीच्या बातम्यांमधून कळले.)

याचवेळी वाडेकरांचा मला मोबाईल आला- “तुम्ही कुठे आहा ? इथे समोरच्या Leopold Cafe मध्ये गुंडांचा गोळीबार सुरू आहे. (हेच हल्लेखोर नंतर Hotel Taj मध्ये मागच्या गल्लीतून घुसले.) तुम्ही लवकर या.” वाडेकरांचे हे वाक्य ऐकताच मला शंका आली आणि मी उत्तर दिले- “इथेही सीएसटीवर असेच काही सुरू आहे. मला वाटते, हा नक्कीच दहशतवादी हल्ल्याचा प्रकार आहे.”

पोलिसांच्या गराड्यामुळे नंतर दोन तास गर्दीत अडकलो असताना घाबरलेल्या लोकांच्या मोबाईल संभाषणांमधून हे स्पष्टच झाले की, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी हल्ला केला आहे. वाडेकरांनीही पुन्हा फोन करून याला दुजोरा दिला. कार्यालयात परतल्यावर तर टीव्हीवर हल्ल्याची थेट दृश्येच पाहावी लागली आणि संपूर्ण रात्र जागून काढावी लागली.

– विनोद देशमुख

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

74 स्टेशनों पर 'वन स्टेशन, वन प्रोडक्ट' 2.46 करोड़ की रिकॉर्ड कमाई

Mon Nov 27 , 2023
– स्थानीय कारीगरों के चेहरे खिले नागपुर :- रेल मंत्रालय द्वारा जारी ‘वन स्टेशन, वन प्रोडक्ट’ योजना को मध्य रेल जोन में शानदार प्रतिसाद मिल रहा है. जोन के तहत 74 स्टेशनों पर चल रहे 79 स्टाल्स पर अब तक रिकॉर्ड 2.46 करोड़ आय दर्ज की जा चुकी है. उल्लेखनीय है कि रेल मंत्रालय ने भारत सरकार के ‘वोकल फॉर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com