नागपूर :- नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी मनपाद्वारे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये मालमत्ता कराची चालू वर्षाची पूर्ण रक्कम एकमुस्त नागपूर महानगरपालिका निधीत 30 जून पर्यंत जमा करणाऱ्या मालमत्ता धारकास कर रक्कमेत १५ टक्के सूट दिली जाणार आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या ऑनलाईन पेमेंट सुविधेचा वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करून चालु वर्षातील कराचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
सदर योजनेबाबत माहिती देताना उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांनी काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार, ३० जून २०२३ पूर्वी चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कर रक्कम नागपूर महानगरपालिका निधीत जमा केल्यास एकूण १५ टक्के सूट दिल्या जाणार आहे. १५ टक्के सूट अशी आहे की, चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची आगाऊ रक्कम नागपूर महानगरपालिका निधीत जमा केल्यास १० टक्के सूट आणि आनलाइन पेमेंट सुविधेचा वापर करुन चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कर रक्कम नागपूर महानगरपालिका निधीत जमा केल्यास ५ टक्के सूट असे एकूण १५ टक्के सूट चालू आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कर रक्कमेत दिली जाणार आहे.
याशिवाय ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कर रक्कम नागपूर महानगरपालिका निधीत जमा केल्यास एकूण १० टक्के सूट दिली जाणार आहे. १० टक्के सूट अशी आहे की, चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची आगाऊ रक्कम नागपूर महानगरपालिका निधीत जमा केल्यास ५ टक्के आणि जर आनलाईन पेमेंट सुविधेचा वापर करुन चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कर रक्कम नागपूर महानगरपालिका निधीत जमा केल्यास ५ टक्के अशी एकूण १० टक्के सूट चालू आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कर रक्कमेत दिली जाणार आहे.
थकीत मालमत्ता करासाठी ही सवलत लागू असणार नाही. थकीत मालमत्ता कर रक्कम ऑनलाईन पेमेंट सुविधेचा वापर करून मनपा निधीत जमा केल्यास थकीत मालमत्ता रक्कमेवर ५ टक्के सूट लागू होणार नाही. प्रत्येक चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची एकमुस्त रक्कम त्या चालू आर्थिक वर्षाकरिता मालमत्ता कर रक्कम जमा करण्याकरिता विहीत केलेल्या दिनांकापूर्वी नागपूर महानगरपालिका निधीत ऑनलाईन पेमेंट सुविधेद्वारे एकमुस्त रक्कम जमा करणारा मालमत्ताधारक संबंधित मालमत्तेच्या कर रक्कमेत सूट मिळण्यास पात्र असेल.
२०२३-२४ या चालू आर्थिक वर्षात ऑनलाईन सुविधेचा वापर करून मनपा निधीत मालमत्ता कर रक्कम जमा करणा-या मिळकतदारास १ एप्रिल २०२३ पासून कर रक्कमेत सवलतीचा लाभ मिळेल, असेही मिलींद मेश्राम यांनी सांगितले.