राज्यात सप्टेंबरमध्ये १३ हजार बेरोजगारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये सप्टेंबर २०२२ मध्ये १३ हजार ०२४ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. महास्वयं वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, ‘बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते’.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९८ हजार ४०७ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, माहे सप्टेंबर २०२२ मध्ये विभागाकडे ३६ हजार ६३४ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ४ हजार ५६८, नाशिक विभागात ४ हजार ४०६, पुणे विभागात १५ हजार ५९०, औरंगाबाद विभागात ७ हजार ६४५, अमरावती विभागात २ हजार ०२८ तर नागपूर विभागात २ हजार ३९७ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

सप्टेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १३ हजार ०२४ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात २ हजार ३४६, नाशिक विभागात १ हजार ४७४, पुणे विभागात ३ हजार ७१३, औरंगाबाद विभागात सर्वाधिक ३ हजार ७३३, अमरावती विभागात ९८० तर नागपूर विभागात ७७८ बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथे आयोजित महारोजगार मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

नोकरीइच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

"राज्यातील माता मृत्युदर कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी प्रयत्न करावे" - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Fri Oct 14 , 2022
मुंबई :- “सर्वसाधारणपणे डॉक्टर्स एकावेळी एकाच रुग्णाला सेवा देत असतात, परंतु प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ एकावेळी दोन जीवांना आरोग्य व जीवन देण्याचे पुण्यकार्य करीत असतात. देशातील माता मृत्युदर प्रति लक्ष १०३ इतका असला तरीही महाराष्ट्रात तो प्रतिलक्ष ३८ इतका कमी आहे. राज्याची या क्षेत्रातील प्रगती उल्लेखनीय अशीच आहे. तरीही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील तज्ज्ञांनी हा माता मृत्यू दर आणखी कमी करण्याच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!