Ø महाराष्ट्र शासन व एचसीएल कंपनीमध्ये सामंजस्य करार
Ø विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी
नागपूर :- बारावीचे शिक्षण पूर्ण करून आयटी कंपनीत आंतरवासिता(इंटर्नशिप) करण्याची व कायम नोकरीची संधी महाराष्ट्र समग्र शिक्षा कार्यक्रमाद्वारे एचसीएल कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे मिळाली आहे. बारावीनंतर आयटी कंपनीतील कामाच्या अनुभवासोबतच आवडत्या विषयात पदवी व उच्च शिक्षण पूर्ण होत आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया आज मिहान येथील एचसीएल कंपनीमध्ये रुजू झालेल्या विद्यार्थ्यांनी दिली.
‘अर्ली करीअर प्रोग्राम’द्वारे हक्काची नोकरीही मिळाली आणि शिक्षणही पूर्ण होत असल्याचे समाधान व आनंद आहे.अन्य विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेत जीवनाचा मार्ग प्रशस्त करावा,अशा भावना आज या विद्यार्थ्यांनी ‘प्रिंसिपल मिट’ कार्यक्रमात शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांसमोर व्यक्त केल्या.
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि एचसीएल टेक कंपनीने शिक्षक दिनाच्या औचित्याने ‘प्रिंसिपल मिट’ कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात उपस्थित जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक शिक्षण) रवींद्र काटोलकर आणि एचसीलएलचे सहायक महाव्यवस्थापक साजेश कुमार यांच्यासह नागपूर शहरातील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांसमोर विद्यार्थ्यांनी अनुभव कथन केले.
महाराष्ट्रासह अन्य राज्यांच्या सहभागी विद्यार्थ्यांनी १०वी आणि १२वीचे शिक्षण घेत असताना योग्य नियोजनकरून अर्ली करीअर प्रोग्रामद्वारे आयटी कंपनीत सुरू असलेली नोकरी व शिक्षणाच्या प्रवासाची माहिती दिली. या प्रवासात उद्योग क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार सुत्रबद्धपणे होणारी तयारी, नोकरीच्या प्रत्यक्ष अनुभवातून अर्जित केलेले ज्ञान व आत्मविश्वास अशा विविध बाबी या विद्यार्थ्यांनी अधोरेखित केल्या. शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांनी विचारलेले प्रश्न व शंकांचे या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने व समर्पकरित्या दिलेले उत्तरही विशेष ठरले.
तत्पूर्वी, साजेश कुमार यांनी आपल्या उद्बोधनात या कार्यक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल्यास उद्योग क्षेत्राला चांगले मनुष्यबळ मिळेल आणि कंपनीतील कौशल्य अर्जीत केल्याने नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्य शिक्षणाचा उद्देशही पूर्ण होणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
रवींद्र काटोलकर म्हणाले, नागपूर जिल्ह्यातील 1100 शाळा आणि 500 कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपर्यंत ‘अर्ली करीअर प्रोग्राम’ विषयी माहिती पोचवू. दर महिन्याच्या २५ तारखेला मुख्याध्यापकांसोबत होणाऱ्या संवाद कार्यक्रमांतर्गत येत्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘अर्ली करीअर प्रोग्राम’ अंतर्गत विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे माहिती पोचविणाऱ्या नागपुरातील तीन प्रमुख शाळांना यावेळी गौरविण्यात आले. अन्य शाळांचाही यावेळी सन्मान करण्याल आला.
Ø असा आहे ‘अर्ली करीअर प्रोग्राम’
Ø विद्यार्थ्यांना १० हजार रुपये महिन्याचा भत्ता
माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या ‘एचसीएल टेक’ कंपनीशी महाराष्ट्र समग्र शिक्षा मार्फत सामंजस्य करार करण्यात आला आहे. याअंतर्गत राज्य शासनातर्फे ‘महाराष्ट्र यंग लीडर ॲस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम’ राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत २० हजार विद्यार्थ्यांना सशुल्क प्रशिक्षण देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत बारावी गणित विषय असणाऱ्या इच्छुक व २०२४ मध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ,प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ६ महिने सशुल्क प्रशिक्षण व ६ महिने लाईव्ह प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळणार आहे.
या ६ महिन्यांच्या आंतरवासिता कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना १० हजार रुपये प्रशिक्षण भत्ता मिळत आहे. तर एका वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आयटी प्रोफेशनल म्हणून कायम नोकरी, तसेच पगार व सोबतच उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे बिटस् पिलानी, शास्त्रा, ॲमिटी, आयआयएम-नागपूर व केएल अशा नामवंत विद्यापीठांमधून उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधीही मिळत आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च काही प्रमाणात एचसीएल कंपनी स्कॉलरशीप स्वरूपात देत आहे.