· तालुका स्तरीय समिती गठीत
· ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज स्विकारणार
· १ जुलै पासून योजनेचा लाभ मिळणार
नागपूर :- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला नागपूर विभागात १२ लक्ष १५ हजार ९९० लाभार्थी महिलांनी अर्ज सादर केले आहेत. या योजनेमध्ये लाभार्थी महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला आहे. योजनेच्या लाभासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.
महिला व बाल विकास विभागातर्फे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’ च्या सहनियंत्रण व आढावा घेण्याकरिता जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच तालुकास्तरावर तीन अशासकीय सदस्य असलेली समिती गठीत करण्यात आली असुन या समितीचे सदस्य सचिव म्हणून तहसिलदार हे काम पाहणार आहे. या समितीकडे योजनेची देखरेख व सनियंत्रण करणे, योजनेचा नियमित आढावा घेणे, तसेच या योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याबरोबर ग्रामिण स्तरावर प्राप्त झालेले अर्ज, त्यांची छाननी व तपासणी करणे तसेच अर्ज सोबतच्या कागदपत्राची पडताळणी करणे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या समिती मध्ये दहा सदस्यांचा समावेश आहे.
नागपूर विभागात ६ लक्ष १८ हजार ५३९ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. तर ऑफलाईन पध्दतीने ५ लक्ष ९७ हजार ४५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी अडचण येणार नाही यासाठी १५ हजार ३११ मदतकेंद्र सुरु करण्यात आले आहेत. या केंद्रावर १५ हजार ३४२ मनुष्यबळ नियूक्त केले आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्हानिहाय प्राप्त झालेला अर्जामध्ये नागपूर जिल्ह्यात ३ लक्ष ५० हजार ९२७ अर्जाचा समावेश असून यामध्ये १ लक्ष २४ हजार ४५८ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले तर २ लक्ष २६ हजार ४६९ ऑफलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात ८५ हजार ९२० अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये ६५ हजार ८७८ ऑनलाईन तर २० हजार ४२ ऑफलाईन अर्ज प्राप्त झाले आहे. भंडारा जिल्ह्यात १ लक्ष ४ हजार ८१५ अर्ज प्राप्त झाले असून ७२ हजार ९९१ अर्ज ऑनलाईन तर ३१ हजार ८२४ अर्ज ऑफलाईन प्राप्त झाले आहे.
गोंदिया जिल्ह्यात आजपर्यंत ३ लक्ष २१ हजार ८४५ अर्ज प्राप्त झाले असुन यामध्ये १ लक्ष ८० हजार ६५ अर्ज ऑनलाईन तर १ लक्ष ४१ हजार ७८० अर्ज ऑफलाईन पध्दतीने प्राप्त झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १ लक्ष ६८ हजार ३८४ अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये १ लक्ष ४ हजार २३२ अर्ज ऑनलाईन तर ६४ हजार १५२ अर्ज ऑफलाईन प्राप्त झाले आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात १ लक्ष ८४ हजार ९९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये ७० हजार ९१५ अर्ज ऑनलाईन तर १ लक्ष १३ हजार १८४ अर्ज ऑफलाईन प्राप्त झाले आहेत.
महिलांचे आर्थिक, सामाजिक पुर्नवसन करण्यासोबतच त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली असून महिला आणि त्यांच्यावर अवलंबुन असलेल्या मुलांना आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा घडवून आणणाऱ्या या योजनेमध्ये महिलांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.