गडचिरोली :- गेल्या पाच वर्षांत गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या आक्रमक कारवायामुळे बहुतांश नक्षल नेते ठार झाल्याने जिल्ह्यात ही हिंसक चळवळ कमकुवत झाली. सत्ता परिवर्तनानंतर छत्तीसगडमध्ये देखील पोलिसांनी नक्षलवादाविरोधात मोर्चा उघडला असून पाच महिन्यांत तब्बल १०७ नक्षल्यांना ठार केले. विशेष म्हणजे या चकमकी ‘अबुझमाड’च्या जंगलात झाल्याने नक्षल्यांचा गड पुन्हा एकदा राज्यासह केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या ‘रडार’वर आला आहे.
नक्षल चळवळीत छत्तीसगड महाराष्ट्राच्या गडचिरोली सीमेवर असलेल्या ‘अबुझमाड’ भागाला सर्वाधिक महत्व आहे. अत्यंत किचकट भौगोलिक रचना, घनदाट जंगल व उंच टेकड्यांनी वेढलेला हा परिसर सामान्य नागरिकांसह प्रशासनासाठीदेखील एक गूढ कथा राहिलेला आहे. मोठ्या हिंसक कारवाईनंतर नक्षलावादी पळून जाऊन याच ठिकाणी लपून बसतात. तब्बल ४ हजार चौरस किलोमीटर विस्तीर्ण अशा या डोंगराळ भागात प्रामुख्याने संरक्षित आदिवासी माडिया जमातीचे वास्तव्य आहे. यांच्याआड नक्षलवादी मागील कित्येक वर्षांपासून ही चळवळ तेथे राहून नियंत्रित करीत आहे. लागून असलेला छत्तीसगड ‘नॅशनल पार्क’ परिसरदेखील त्यांना संरक्षणासाठी उपयोगाचा ठरतो. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना थेट घुसून कारवाई करण्यात मोठी अडचण निर्माण होत असते. परिणामी कित्येक वर्षांपासून नक्षलवाद्यांचे मोठे नेते याठिकाणी वास्तव्यास आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिलेल्या माहितीनुसार सध्याच्याघडीला अबुझमाडमध्ये दीड हजारावर सशस्त्र नक्षलवादी आहेत. परंतु हिडमा सारख्या धोकादायक नक्षलवाद्याच्या गावात पोलीस केंद्र उभारून पोलिसांनी थेट आव्हान दिले आहे.दुसरीकडे अबुझमाडच्या प्रवेशद्वारावर मोठ्या कारवाया करून तब्बल १०७ नक्षल्याना कंठस्नान घातले. त्यामुळे नक्षल्यांचे धाबे दाणाणले आहेत.
सुरक्षा वाढविण्याचे आव्हान
हा परिसर प्रामुख्याने छत्तीसगडच्या बस्तर भागतील सुकमा, नारायणपूर, कांकेर आदी जिल्ह्याला तर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याचे शेवटचे टोक भामरागड, एटापल्ली तालुक्याला लागून आहे. गडचिरोली पोलिसांनी प्रवेशद्वारावर चार स्टेशन उभारल्याने नक्षल्यांची मोठी कोंडी झाली. त्यामुळे गडचिरोलीत पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत कोणतीही हिंसक घटना घडली नाही. याच धरतीवर छत्तीसगड पोलीस प्रशासन अबुझमाडच्या दुर्गम भागात पोलीस मदत केंद्र उघडण्याच्या तयारीत आहे. यासाठी केंद्र सरकार लवकरच ‘आयटीबीपी’ आणि ‘बीएसएफ’ फौज त्याठिकाणी तैनात करणार असल्याचे कळते.