मुंबई :- राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. या रोगाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण ७३ टक्के करण्यात आले आहे. उर्वरित लसीकरण ७ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. लसीकरण करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहील, असे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
मंत्री विखे पाटील यांनी रॉयल स्टोन या शासकीय निवासस्थान येथून राज्यातील लम्पी चर्मरोगाविषयी दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे उपस्थित होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे आयुक्त हेमंत वसेकर यांच्यासह सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.
आतापर्यंत ७३ टक्के गोवर्गीय पशुधनाचे Goat Pox लसीकरण
मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यात एकूण १ कोटी ४१ लाख गोवर्गीय पशुधन आहे. आतापर्यंत ७३ टक्के गोवर्गीय पशुधनाचे गोट पॉक्स (Goat Pox) लसीकरण झाले आहे. १.०२ कोटी उर्वरित लसीकरण एक आठवड्यात पूर्ण करण्यासाठी नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात मार्च २०२३ ते २० ऑगस्ट २०२३ पर्यंत एकूण ३२ हजार ७० पशुधन लम्पी बाधित आहे. त्यापैकी २० हजार ८९८ बरे झाले असून सक्रिय रुग्ण ८हजार ६२३, मृत पशुधन २ हजार ७७५ सक्रिय पशुरुग्ण असणारे जिल्हे २५ असून, सन २०२३-२४ मध्ये १.४१ कोटी लसी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
पशुपालकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक
मंत्री विखे पाटील म्हणाले की, ग्रामपंचायत व नगरपंचायत यांच्याकडील यंत्रणेच्या मदतीने बाह्य कीटक नियंत्रणासाठी (Vector Control) उपाययोजना तातडीने व नियमितपणे राबविण्याची आवश्यकता आहे. यासाठी परिसरामध्ये वेळोवेळी फवारणी व स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या मदतीने या रोगाबाबत पशुपालकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये रोगाची माहिती त्वरित देणे, बाधित जनावरांचे विलगीकरण, गोठ्यांची व परिसराची स्वच्छता इत्यादीबाबत पशुपालकांना ग्रामसभांच्या माध्यमातून माहिती द्यावी.
भरपाईच्या प्रस्तावांना तत्काळ मान्यता
या रोगाने मृत्यूमुखी पडणाऱ्या पशुधनाची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी ग्रामपंचायत यंत्रणेचा सहभाग घ्यावा. केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार, विलगीकरण, प्रतिबंधात्मक उपाययोजना व मृत पशुधनाची विल्हेवाट इत्यादींबाबत काटेकोर पालन करावे.
सन २०२३-२४ मध्ये या आजाराने मृत पावलेल्या पशुधनाच्या मालकांना नुकसानभरपाई देण्याबाबत जिल्हास्तरीय समितीकडून पात्र प्रस्तावांना मान्यता देण्याबाबतची कार्यवाही तत्काळ करावी.
बाजार भरविण्यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिबंध करण्यासंबंधीचे निर्देश
आंतरराज्य, आंतरजिल्हा बाधित जनावरांच्या वाहतुकीच्या अनुषंगाने या गोवंशीय पशुंचे २८ दिवसांपूर्वी लसीकरण झालेले नाही, अशा पशुधनाच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यासंबंधीचे तसेच आवश्यकतेनुसार बाजार भरविण्यासंदर्भात प्रतिबंध करण्यासंबंधीचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.
दिरंगाई केल्यास तत्काळ कारवाई करणार
सचिव मुंडे म्हणाले की, लंपी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार गाई व बैलांपासून किंवा गाईच्या दुधापासून मानवामध्ये संक्रमित होऊ शकत नाही. त्यामुळे भीती बाळगू नये. मृत पशुधनाविषयी प्रत्यक्षात अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. साथीचे इतरही आजार पशुधनास होऊ शकतात, यावरही उपचार करावेत. कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील, तर आयुक्त किंवा आपण स्वत: उपलब्ध राहू. लम्पी आजार निर्मूलनासाठी सबंधित कोणत्याही स्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिरंगाई केल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.