नागपूर :- डिसेंबर 2019 पासून वीजबिलापोटी थकीत असलेल्या 11.30 लाखांपैकी 10 लाखाचा एकरकमी भरणा करीत बोकारा ग्रामपंचायतीने महावितरणच्या आवाहनाला अनुकूल प्रतिसाद दिला आहे.
महावितरणच्या सावनेर विभाग आणि खापरखेडा उपविभाग अंतर्गत असलेल्या बोकारा ग्रामपंचायतीने डिसेंबर 2019 पासून वीजबिलांचा भरणा केलेला नव्हता, या ग्रामपंचायतीच्या नावे दोन वीजजोडण्या असून त्यावर जानेवारी 2024 पर्यंत 7 लाख 82 हजार 880 आणि 3 लाख 49 हजार 980 अशी तब्बल 11 लाख 32 हजार 860 रुपयांची थकबाकी झाली होती, ही थकबाकी वसुल करण्यासाठी खापरखेडा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मंगेश कहाळे सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना अनुकूल प्रतिसाद देत बोकारा ग्रामपंचायतीने मंगळवार, दि. 13 फ़ेब्रुवारी रोजी थकबाकीपोटी तब्बल दहा लाख रुपयांचा एकरकमी भरणा केला.
थकबाकी वसुलीसाठी केलेल्या पाठपुराव्यासाठी नागपूर ग्रामिणचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांनी सावनेर विभागाच्या कार्यकारी अभियंता दिपाली माडेलवार, खापरखेडा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मंगेश कहाळे यांच्यासह कर्मचा-यांचे कौतुक केल आहे. कापरखेडा उपविभागाने ही थकबाकी वसुल करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि पाठपुराव्याचा किता गिरवित इतर उपविभागांनी देखील त्यांच्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडील थकबाकी वसुल करावी, असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.