‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

– ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत विविध योजनांचे लाभ वाटप

प्रस्तावित योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण

बीड :- ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या माध्यमातून 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला आहे. हेच या योजनेचे ठळक यश असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

परळी येथील ओपळे मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत विविध योजनांचे लाभ वाटप व जिल्ह्यातील प्रस्तावित येाजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हयाचे पालकमंत्री व कृषिमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार लक्ष्मण पवार, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार नमिता मुंदडा, आमदार संजय दौंड, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील 20 जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला असून त्यातील गर्दीचे सारे उच्चांक या कार्यक्रमांने मोडले याबद्दल कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष अभिनंदन करतो. असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना 749 कोटी रुपयांच्या विविध योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले. प्रस्तावित इमारत व वस्तीगृह आणि तीर्थश्रेत्र परळी विकास अंतर्गत असलेल्या विविध 892 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

यातील परळी येथील तीर्थश्रेत्र विकास आराखडा महत्वाचा आहे. यासाठी शासनाने 286.68 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी प्रदान केली आहे. याखेरीज जिल्ह्यातील नवे जिल्हाधिकारी, प्रशासकीय, कृषि कार्यालय, सिरसाळा एमआयडीसी आदीसह भगवानबाबा विद्यार्थी वसतिगृह इमारत यांचा यात समावेश आहे.

नागरी सुवर्णोत्थान कार्यक्रमासाठी कालच 141 कोटी रुपयांची मंजूरी देण्यात आली आहे. असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यास पुरवणी मागणीत अधिक मदत व निधी देण्याचा प्रयत्न शासन करेल. कृषिमंत्री झाल्यानंतर 100 दिवसात शेतकरी लाभाचे 75 निर्णय कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतले हे देखील उल्लेखनीय आहे. असे शिंदे म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकासाला सर्वोच्य प्राधान्य दिले आहे. एकही दिवस त्यांनी सुटी घेतली नाही, असे प्रधानमंत्री आपल्याला लाभले हे आपले भाग्य आहे. शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे. नुकसान भरपाईत वाढ केली असून, एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही तातडीने देण्यात आले आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी शासन बचतगटाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. बीडच्या औद्योगिक विकासाला चालना देणार असून यातून येथील लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. बीडच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य राहील. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला हक्काचे व टिकणारे आरक्षण देणार असल्याचेही ते म्हणाले.

गोपीनाथ गड येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री मुंडे यांनी अभिवादन केले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच सर्व मान्यवरांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेवून विकास आराखडयातील कामांचे भूमिपूजन केले.

महाराष्ट्र सुजलाम – सुफलाम करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना दिवसा सलग 12 तास विघुत पुरवठा उपलब्ध झाल्यास शेतकरी समृध्द होणार आहे. ही जाणीव ठेवून प्रत्येक शेतकऱ्याला सौर उर्जा उपलब्ध करुन पूर्ण वर्षभर दिवसाला 12 तास वीज मिळावी असे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांसोबत शासन आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी समृद्धी योजना टप्पा 2 मधून आगामी काळात शेतकऱ्यांना स्थैर्य प्राप्त होईल, यासाठी प्रयत्नशील आहे. 11 हजार 400 कोटी रुपये खर्चून कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेतून कामे होत आहेत. मराठवाडा ग्रीडचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. जलयुक्त शिवार टप्पा 2 मध्ये बीड जिल्हा अग्रेसर राहील. बीडच्या आठही साठवण तलावांना मान्यता दिल्याचे फडणवीस म्हणाले. मुंडे यांनी केलेल्या वैजनाथ तीर्थश्रेत्र योजनेच्या मागणीच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.

केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देशाला 5 ट्रिलियनचे उद्दीष्ट गाठायचे आहे. त्यात राज्याचा वाटा 1 ट्रिलियन असावा यासाठी प्रयत्न आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अनेक महत्वाची विकासकामे सुरू आहेत. कामे गतीने पूर्ण झाली आहेत, याचे समाधान आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. कृषी विभागाचे मागील काही महिन्यात 75 शासन निर्णय निघाले आहेत. पीक विमा योजनेत 48 लाखाहून अधिक अर्ज विम्यासाठी पात्र आहेत. कोट्यवधी रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बीड जिल्ह्याचे मागासलेपण दूर करून जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करू – कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे

शासन आपल्या दारी उपक्रमातून 36 हजार लाभार्थ्यांना लाभ झाला, याचा आनंद झाला आहे. बीड जिल्ह्याचे मागासलेपण दूर होऊन आगामी काळात सर्वात जास्त विकसित जिल्हा म्हणून लौकिक राहील, यासाठी प्राधान्याने काम करु व जिल्ह्यात विकासाची गंगा आणू, सर्वजण मिळून जिल्ह्याचा विकास करू, असेही मुंडे म्हणाले.

महिलांसाठी आठ निवासी शाळा, कृषी महाविद्यालय, अंबाजोगाईत देवणी गोवंश केंद्र आदी विकासकामे शासनाने केली आहेत. देशात उज्जैन, काशी विश्वेश्वर या धर्तीवर परळी वैजनाथ येथे प्रसाद योजनेंतर्गत प्रस्ताव राज्याने केंद्राला पाठवावा. त्याचबरोबर परळीच्या औद्योगिक विकासाला अधिक चालना द्यावी आणि यासह बीड जिल्ह्याचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात 1400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केल्याबद्दल आभारही मुंडे यांनी मानले.

माजी पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, परळीच्या विकासासाठी कोणतेही सहकार्य करायची माझी तयारी आहे. जिल्हा सर्व श्रेत्रात अग्रेसर असावा असे विचार आपण सातत्याने करतो, असेही त्या म्हणाल्या.

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी प्रास्ताविकात जिल्हाभरात सुरु असलेल्या विविध योजना तसेच उपक्रमाबाबतची माहिती दिली.

ठळक नोंदी

या कार्यक्रमासाठी एस.टी. महामंडळाच्या 580 बसेस लाभार्थ्यांना आणण्यासाठी घेण्यात आल्या होत्या.

आजचा मुख्यमंत्री यांचा दौरा हा प्रचंड गर्दीचा दिवस आणि उच्चांकी उपस्थिती असल्याचे ठरला.

परळी शहरात जागोजागी मोठमोठ्या कमानी उभारण्यात आल्या होत्या.

विविध शासकीय विभागांच्या लाभाच्या योजनांची माहिती देणारे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

मंत्री महोदयांनी गोपीनाथ गड येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. त्यानंतर परळी तीर्थश्रेत्र विकास कार्यक्रमाचे भूमिपूजन केले. एकाच वेळी गोपीनाथ आणि वैद्यनाथ या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख् केला.

भूमिपूजन कामे

1) जिल्हाधिकारी कार्यालय, बीड

2) मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, बीड

3) कृषि भवन, बीड

4) संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलीचे वस्तीगृह, बीड

5) संत भगवानबाब ऊसतोड कामगार मुलींचे वस्तीगृह, शिरुर कासार

6) कृषि महाविद्यालय, जिरेवाडी ता. परळी

7) कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, जिरेवाडी ता. बीड

8) सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपक्रेंद, धर्मापूरी ता. परळी

9) एमआयडीसी विस्तार सिरसाळा, ता. परळी

10) श्रीश्रेत्र परळी विकास आराखडा विकास आराखडा कामे

11) परळी बसस्थानक, परळी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रम

Wed Dec 6 , 2023
मुंबई :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली दादर, शिवाजी पार्क येथे माहिती व प्रसिद्धी स्टॉल व भोजन स्टॉल उभारण्यात आलेला आहे. या माहिती स्टॉलचे उद्घाटन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई विभाग श्रीमती वंदना कोचुरे यांच्या हस्ते करण्यात आले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com