समृद्धी महामार्गावर शून्य अपघात उपाययोजना आखण्यात येईल – दादाजी भुसे

– महत्वाकांक्षी प्रकल्पाला अफवांचे गालबोट नको

नागपूर :- हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अविकसित भागाच्या समतोल विकासाचा राजमार्ग आहे. जगातल्या उत्तमोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून या महामार्गावर अपघात होणारच नाहीत, अशा पद्धतीच्या उपाययोजना करण्यात येईल, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या नागपूर भेटीत त्यांनी समृद्धी महामार्गाच्या संदर्भातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दोन तास विचारमंथन केले. आज सकाळी नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर येथील बैठकीमध्ये महामार्गाच्या निर्मितीपासून तर महामार्ग पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासात या रस्त्याचे महत्त्व त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणून घेतले.

या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव, ए.बी. गायकवाड, एस.एस मुराडे, मुख्य महाव्यवस्थापक भारत बास्तेवाड, मुख्य अभियंता एस.के. सुरवसे, निशिकांत सुके, सुरेश अभंग, भूषण मालखंडाळे आदींसह समृद्धी महामार्गाशी संबंधित सर्व जिल्ह्यांचे अभियंते, विविध कामांसाठी नियुक्त करण्यात आलेले कंत्राटदार, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

विदर्भ, मराठवाडा आदी मागास भागांच्या विकासासाठी या मार्गाची निर्मिती करण्यात आली असून जगातील एक महत्त्वाचा महामार्ग महाराष्ट्रात आकाराला येत आहे. अद्याप हा महामार्ग मुंबईपर्यंत पूर्ण व्हायचा आहे. एकदा हा महामार्ग आपल्या पूर्ण क्षमतेने कार्यरत झाला की, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले परिश्रम, त्याची फलश्रृती व उभय नेते या रस्त्याबाबत का गंभीर आहेत हे दिसून येईल, असे त्यांनी सांगितले.

विकासाचा समतोल साधणारा सेतू म्हणजे समृद्धी मार्ग आहे. पूर्णता कार्यप्रवण झालेल्या महामार्गामार्फत महाराष्ट्राच्या 15 जिल्ह्याच्या विकासाची दिशा ठरेल, प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी आतापर्यंत झालेल्या अपघाताचे विभागामार्फत करण्यात आलेले विश्लेषण जाणून घेतले. अन्य ठिकाणी याच काळात झालेल्या अपघातांची संख्या व या महामार्गावर झालेल्या अपघातांची संख्या याची तुलना योग्य ठरणार नाही. मात्र हा अद्यावतमार्ग अपघातापासून मुक्त असावा, यासाठी जागतिक दर्जाचे सर्व तंत्रज्ञान वापरण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जवळपास 20 हजार वाहने रोज या रस्त्याचा वापर करत आहे. या रस्त्याची सकारात्मक बाजूही जनतेपुढे आली पाहिजे. केवळ अफवांमुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गालबोट लागतात कामा नये. त्यामुळे दीर्घकालीन व अल्पकालीन उपाययोजना उद्यापासून रस्त्यांवर अमलात आल्या पाहिजे असे त्यांनी सांगितले.

या रस्त्याची आज पाहणी झाल्यानंतर काही धोरणे ठरविण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने करा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

नियमाने चालणारे वाहन चालक, उद्योग व्यापार क्षेत्रातील दिग्गज रस्त्याचे कौतुक करतात. त्यामुळे प्रसंगी कडक शिस्त लावण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही. तपासण्याही आवश्यकतेनुसार वाढवण्यात येतील. मात्र यापुढे विभागाने अपघात शून्य महामार्ग ही संकल्पना घेऊन जोमाने कामाला लागावे, असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. बैठकीनंतर त्यांनी वायफळ येथून समृद्धी महामार्गासाठी प्रवासाला सुरुवात केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्टॅनफोर्ड विद्यापीठ औषधनिर्माण विभागाच्या प्राध्यापकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Fri Jul 21 , 2023
– दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी एआय तंत्रज्ञान उपयुक्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- राज्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहचविण्यासाठी एआय तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे औषधनिर्माण विभागाचे प्राध्यापक डॉ. अनुराग मैरल यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन राज्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com