मनपाच्या पुढाकाराने खुलू लागले चौकांचे सौंदर्य : थीमबेस पेडेस्ट्रीयन
नागपूर :- नागपूर शहरातील प्रमुख इमारती, कार्यालयांची ओळख आता परिसरातील रस्तेच दर्शवू लागले आहेत. झिरो मॉईल, संविधान चौक अर्थात रिझर्व्ह बॅंक चौक, विधानभवन चौक, आकाशवाणी चौक, जीपीओ चौक लेडीज क्लब चौक, दीक्षाभूमी चौक या चौकांमध्ये येताच येथील सिग्लनवरील झेब्रा क्रॉसिंग आपली विशेषत: दर्शवितात. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या पुढाकाराने नागपूर शहरात ‘थीमबेस पेडेस्ट्रीयन क्रॉसिंग’ साकारण्यात आलेले असून चौकांचे सौंदर्य देखील खुलू लागले आहे.
विशेष म्हणजे, असे बोलके ‘थीमबेस पेडेस्ट्रीयन’ साकारणारी नागपूर महानगरपालिका महाराष्ट्रातील पहिलीच मनपा आहे. देशात नोयडा शहरानंतर नागपुरात ही संकल्पना राबविण्यात आल्याचे मनपा वाहतूक विभागातर्फे सांगण्यात आले आहे. नागपूर शहरात सिव्हील लाईन्समध्ये प्रायोगिक तत्वावर साकारलेले हे ‘थीमबेस पेडेस्ट्रीयन क्रॉसिंग’ संपूर्ण शहरातही साकारण्यात येणार असल्याचेही विभागातर्फे सांगण्यात आले.
‘थीमबेस पेडेस्ट्रीयन’ अंतर्गत परिसरात असलेली वास्तू, कार्यालय यांची माहिती झेब्रॉ क्रॉसिंगवर साकारण्यात आलेली आहे. देशाचे केंद्रबिंदू असलेल्या नागपूर शहरातील ‘झिरो मॉईल’ फ्रीडम पार्क चौकातील सिग्नलवर साकारण्यात आले आहे. शहराचे वैभव असलेल्या कस्तुरचंद पार्कवर ऐतिहासिक रणसंग्रामाची साक्ष देणा-या तोफा आढळल्याच्या स्मृती रिझर्व्ह बॅंक चौकामध्ये साकारण्यात आले आहे. आकाशवाणी नागपुरातून विदर्भात सर्वदूर संगीत, बातम्या आणि माहिती पोहोचविण्याचे काम करीत आहे. या चौकात संगीताच्या खुणा आणि झेब्रा क्रासिंगवरली ऑरगॉन लक्ष वेधून घेतोय. प्रधान डाक घर अर्थात जीपीओ चौकात रस्त्यावरील पत्र या परिसराच्या ओळखीसह जुन्या काळातील पत्रव्यवहाराच्या आठवणी जाग्या करतो. पुढील सिग्नलवर लाल पांढ-या क्रॉसिंगवर साकारलेली विविधरंगी फुले लेडीज क्लब चौकाची ओळख अधोरेखित करतात.
यासंबंधी सविस्तर माहिती देताना कार्यकारी अभियंता यांनी सांगितले की, २०२२-२३ या आर्थिक वर्षात रस्ते दुभाजक व कर्ब पेंटींग करीता एकूण ८०.८१ लक्ष रुपये प्रस्तावित करण्यात आले असून यामध्ये २४४७५ मी लांबीचे काम करण्यात आले. शहरातील १२ चौकांमध्ये विविध थिम बेस, पेडेस्ट्रीयनचे काम करण्याचे प्रस्तावित असून यापैकी विविध चौकात कामे झाल्याचे दिसून येत आहे. या संपूर्ण कामाकरिता २०२२-२३ मध्ये साधारणत: ७५ लक्ष प्रस्तावित करण्यात आले. याशिवाय सुनियोजित वाहतुकीच्या दृष्टीने १० ठिकाणी अनावश्यक दुभाजक मधील गॅप बंद करण्यात आली. शहरातील विविध भागांमध्ये रस्ते मार्कींग झेब्रा क्रॉसींग तसेच उड्डाण पुलाच्या संरक्षण भिंतीचे पेंटिंगचे काम यामध्ये १७.८८ किमी रस्ते, १५ चौक, ६ उड्डाण पूल इ. करीता एकूण रू. २५७.५७ लक्ष निधी खर्च करण्यात आला.
शहरातील विविध ठिकाणी विविध प्रकारचे सूचना फलक लावण्याकरीता १४५ लक्ष रुपये खर्च करण्यात येत असून यामध्ये ७५ चौकांचे नामफलक, ९ कॅन्टीलेवर प्रकारचे सूचना फलक, १३ ठिकाणी शहरात येणाऱ्या पोच मार्गावर स्वागत बोर्ड उभारण्यात येत आहेत. तसेच वाहतुकीच्या दृष्टीने विविध ठिकाणी १४७ सूचना फलक लावण्यात आले आहेत. शहरात बाजार परिसर व वर्दळीच्या ठिकाण ऑन स्ट्रिट पार्कींग करीता ८ ठिकाणी अधिसूचना काढून मार्कींग व सूचना फलक लावण्याकरिता ४० लक्ष रुपये खर्च करण्यात येत आहे. शहरात झालेल्या जी-20 परिषदेच्या दृष्टीने शहरातील विविध रस्ते मार्कींग व पेटींग करीता २३० लक्ष रुपयांची कामे करण्यात आली. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये वाहतूक विभागाअंतर्गत एकूण रू. ८२८.३८ लक्ष ची कामे करण्यात आलेली आहेत.