– २९ ऑगस्टला पुन्हा स्वर -धारा कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर :- जी -२० अंतर्गत सध्या भारतात विविध ठिकाणी विविध विषयांवरील बैठकांचे सत्र सुरू आहे. भारताकडे या जागतिक परिषदेचे यजमानपद असून या निमित्य आकाशवाणी नागपूरमार्फत युथ फेस्ट- २०२३ चे रंगारंग आयोजन सायंटिफिक सभागृहात गुरुवारी सायंकाळी पार पडले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, आकाशवाणीचे उपमहानिदेशक रमेश घरडे, नागपूर आकाशवाणीच्या केंद्रप्रमुख रचना पोपटकर, नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विद्या विभागाचे प्रमुख मोईज हक यांनी या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन केले.
प्रसार भारतीय अंतर्गत नागपूर आकाशवाणीद्वारे आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमातील सर्व सादरीकरणावर काल भारताने यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या चांद्रयान मोहिमेचे गारुड होते. देशभक्तीने ओतप्रोत भारलेल्या वातावरणात रोहित भोगे व साथीदारांचे समर गीत, ओजस हरकरे व चमूचा युथ बँड, समीर नानोटकर आणि चमूचे लोकगीत, प्रीतम घ्यार आणि चमूचे लोकनृत्य चिराग थक्कर आणि चमूचे गीत आणि कविता प्रवीण साखरे आणि चमूचे स्कीट व देशभक्ती गीत सादर करण्यात आले.
नागपूरच्या आठ रस्ता चौक परिसरातील सायंटिफिक सभागृहात विविध मान्यवरांच्या तसेच आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या प्रतिसादात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी जागतिक स्तरावर भारत जी -20 परिषदेअंतर्गत यशस्वीपणे यजमानपद भूषवत असल्याचे स्पष्ट केले. यावर्षी जी -२० साठी वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना ठेवण्यात आली आहे.
नागपूर शहरामध्ये मार्च महिन्यात या आयोजनातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हा व महानगर प्रशासनाने अतिशय उत्तम रितीने आयोजित केली होती, असे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांनीही यावेळी जी -२० आयोजनामागील उद्दिष्ट समजून घेतले. कार्यक्रमाला आकाशवाणी व दूरदर्शनचे सर्व कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. २९ ऑगस्टला याच आयोजनामधील दुसरा कार्यक्रम सायंटिफिक हॉलमध्ये होणार असून यामध्ये मराठी सुगम संगीत भावगीत मराठी गझल हिंदी गझल काव्य गायन आदी कार्यक्रमांचा अंतर्भाव आहे.