यवतमाळ :- जिल्हाधिकारी कार्यालयातील चेतना भवन येथे जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला. ग्राहक दिनानिमित्त विविध विभागांच्यावतीने ग्राहकांच्या जनजागृती स्टॅालद्वारे प्रदर्शन लावण्यात आले होते.
कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, अन्न सुरक्षा अधिकारी अमितकुमार उपलप, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, स्टेट बँक ऑफ इंडीयाचे मुख्य व्यवस्थापक मिलिंद नाईक, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राजेंद्र निमोदीया, अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ आडे, अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समिती यवतमाळचे शिक्षण व क्रीडा प्रमुख अभिजित पवार आदी उपस्थित होते.
यावेळी पोलिस अधीक्षक कार्यालयाचे प्रणय ईतकर यांनी सायबर क्राईम बाबत अत्यंत महत्वाची माहिती दिली. नागरिकांनी डिजीटल व्यवहार करतांना काळजीपुर्वक करावे. फसव्या योजना, अफवा व खोट्या बाबींना बळी न पडता सजगतेने सोशल मीडियाचा वापर करावा, असे ते म्हणाले. आपल्याद्वारे सायबर गुन्हा घडणार नाही याची दक्षता घेण्यासोबतच सायबर गुन्हेगारांकडून आपली फसवणूक होणार नाही, याची देखील दक्षता घेण्याचे आवाहन केले.
यावेळी संजय जोशी यांनी ग्राहकगीत सादर केले व उपस्थित मान्यवरांनी देखील ग्राहकांच्या प्रबोधनाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त ग्राहकांच्या प्रबोधनाच्या दृष्टीकोनातून अन्न व औषध प्रशासन विभाग, वैद्यमापन शास्त्र विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, भारत संचार निगम लिमिटेड, भारत गॅस एजन्सी व नितीन गॅस एजन्सी, स्टेट बँक ऑफ इंडीया, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी या कार्यालयांच्यावतीने जनजागृतीत प्रदर्शनी लावण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यमापन शास्त्र विभागाचे निरिक्षक गजानन पोहनकर यांनी केले. यावेळी त्यांनी ग्राहक दिनामागची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे संचालन विनोद डाखोरे यांनी केले तर आभार जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी मानले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.