भंडारा : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा )यांच्या सौजन्याने शेतकऱ्यांसाठी जिल्हास्तरावर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.या पाच दिवसीय कृषी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आत्मा,जिल्हा कृषी अधिक्षक,जिल्हा माहिती अधिकारी,नगर परिषद कार्यालय,यासह सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण आदींनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज दिले.राज्य शासनाच्या निर्देशानुसार या आर्थिक वर्षात जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.त्यासाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी संचालक आत्मा चव्हाण,जिल्हा कृषी अधिक्षक अर्चना कडू, माविमचे व्यवस्थापक प्रदीप काठोडे, पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ.वाय.एस.वंजारी यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
कृषी महोत्सवाचे आयोजन शेतक-यांना जवळ पडेल अश्या मध्यवर्ती ठिकाणी करण्यात यावे.आयोजक म्हणून आत्मा संचालक कार्य करतील तर चर्चासत्र,प्रयोगशील शेतकरी यांच्या यशोगाथा या महोत्सवात सादर करण्यात याव्यात,अशी सूचना कदम यांनी केली.उमेद बचतगटाच्या महिलांनी या महोत्सवात स्टॉल लावण्यात यावेत.जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी या महोत्सवाची यथोचित प्रसीध्दी करावी. व पूढील बैठकीत आज झालेल्या विषयावरील कार्यवाहीसह सर्व विभागांनी उपस्थित राहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.