*बार्टी प्रादेशिक कार्यालयाचा उपक्रम*
नागपूर :- बार्टी प्रादेशिक कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या महिला जाणीव जागृतीया पर्वाचे आयोजन प्रियदर्शनी महिला वसतीगृहात करण्यात आले होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतीस मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. विवाहाचा निर्णय घेताना सजग रहा.वैवाहाच्या कायदेशीर वयाचे पालन करा. विवाहाला कायद्याचा आधार द्या. प्रेमाच्या नावाखाली स्वत:वर कुठलाही अन्याय होवू देऊ नका. अन्याय झाल्यास न्याय व्यवस्था तुमच्या पाठीशी असल्याची जाणीव जिल्हा विधी प्राधिकरणाच्या ॲड. सुरेखा बोरकुटे यांनी प्रियदर्शनी महिला वसतीगृहातील महिलांना करुन दिली.
सुरवातीस वसतीगृहाच्या अधीक्षक सुकल्पा वरोकर यांनी वसतिगृहाची कार्यपद्धती समजावून सांगितली. येथे येत असलेल्या महिलांची पार्श्वभूमी त्यांचा समाजिक विकासाची जबाबदारी या विषयाची त्यांनी मांडणी केली.जिल्हा विधी प्राधिकरणाच्या एड. सुरेखा बोरकुटे यांनी वसतिगृहातील महिलांना संवैधानिक अधिकाराची जाणीव करुन दिली. तसेच विवाहाचा निर्णय घेतांना घाई न करता सजग राहण्यास सांगितले. यावेळी प्रा. संगीता टेकाडे यांनी नाट्य छटेच्या माध्यमातून महिलांना शिक्षणाची आवश्यकता सांगितली, सोबतच स्वच्छतेचे महत्त्वही पटवून दिले.
बार्टी प्रादेशिक कार्यालयाचे सहायकप्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके यांनी बार्टीच्या योजनांची, बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षणाची माहिती दिली. प्रकल्प अधिकारी सुनीता झाडे यांनी महिलांच्या मुलभूत हक्कांची माहिती देत आपल्या न्यायहक्काबाबत जागृत राहण्यास सांगितले.तत्पूर्वी श्रद्धानंद अनाथालय आधारगृह,स्वाधार गृह नीलकमल सोसायटी, करुणा महिला वसतिगृह, येथे महिला जाणीव जागृतीपर्वाचे आयोजन करण्यात आले होते. उद्या वारांगणा वस्ती इतवारी येथे दुपारी बारावाजता या पर्वाचे आयोजन करण्यात येणार आहे. या पर्वाची सांगता 12 तारखेला राहाटेनगर टोली येथे करण्यात येणार आहे.