– ‘लखपती दीदी’ कार्यक्रमाचे जिल्हा परिषदेतून थेट प्रक्षेपण
नागपूर :- महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत.त्यांनी ठरवले तर त्या असामान्य काम करू शकतात. ग्रामीण भागातील महिलांनी आता आपल्या परिवाराचा कुशलतापूर्वक सांभाळ करीत आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत लखपती दीदी संमेलनाचे आयोजन आज जळगाव येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा परिषदेच्या कै. आबासाहेव खेडकर सभागृहात करण्यात आले होते . या प्रसंगी शर्मा बोलत होत्या. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वर्षा गौरकर उपस्थित होत्या.
लखपती दीदी हे संपूर्ण कुटुंबाला सशक्त करण्याचे अभियान आहे. या माध्यमातून कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. यामुळे लखपती दिदींना भरारी घेण्यासाठी नवी उमेद मिळेल, असा विश्वास शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर लखपती दीदी क्षमता बांधणी मेळावा व प्रशस्तीपत्रक, सन्मानपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास नागपूर तालुक्यातील २५० महिलांची प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थिती होती. यावेळी लखपती दीदी यांना प्रमाणपत्र वितरित करून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रंचालन जिल्हा अभियान व्यवस्थापक शेखर गजभीये यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता जिल्हा व तालुका चमू यांनी सहकार्य केले.