– महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या अनेक सभा पार पडणार आहेत. मतदानपूर्वीचे ४८ तास अतिशय महत्त्वाचे असून निवडणूक आयोग करडी नजर ठेवणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होणार असून आज संध्याकाळी पाच वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत. आज शेवटचा दिवस असल्याने अनेक दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. यंदाच्या निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या सभा पार पडणार आहेत.
प्रचाराचा शेवटचा दिवस
गेल्या महिनाभरापासून राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेते हे प्रचाराच्या रिंगणात उतरले होते. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. आज अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचार सांगता सभा देखील होणार आहे. या सभांमुळे देखील निवडणुकांचे वातावरण बदलण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील उमदेवारासांठी प्रचारसभा घेणार आहेत. मुरबाड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेला उपस्थितीत राहणार आहेत. त्यानंतर नेरुळमध्ये आयोजित केलेल्या भाजप उमेदवार मंदा म्हात्रेंच्या प्रचारसभेसाठी एकनाथ शिंदे जाणार आहेत. यानंतर चेंबूर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार तुकाराम काते यांच्या रोड शो ला ते उपस्थितीत राहतील. यानंतर शेवटी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शायना एन सी यांच्या रोड शो ला ते हजेरी लावतील.
आशिष शेलारांची मराठी कलाकारांसोबत प्रचार रॅली
या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील दौंड विधानसभा, नागपुरातील सावनेर विधानसभा आणि वर्ध्यातील आर्वी विधानसभेत जाहीर सभा होणार आहेत. तसेच वांद्रे पश्चिमचे भाजपचे उमेदवार आणि मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून देखील प्रचार रॅली काढली जात आहे. आशिष शेलार हे मराठी कलाकारांसोबत प्रचार रॅली काढणार आहेत. यावेळी ज्येष्ठ गायक पं. सुरेश वाडकर, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेते अजिंक्य देव, शरद पोंक्षे, नंदेश उमप, पुष्कर श्रोत्री, वैभव तत्ववादी, आदिनाथ कोठारे, गौरव मोरे, किशोरी शाहाणे यांच्यासारख्या दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत.
त्यासोबतच शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्या आज बारामतीत सभा पार पडताना दिसणार आहेत. शरद पवार हे युगेंद्र पवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. तर अजित पवार हे स्वत: उमेदवार असल्याने ते संपूर्ण ताकद लावताना दिसणार आहे. यासोबतच उद्धव ठाकरे यांचीही सभा महाराष्ट्रात आजोयित करण्यात आली आहे.
निवडणूक पथकाकडून करडी नजर
आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवार हे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह रॅली काढत मतदारसंघ पिंजून काढताना दिसणार आहेत. यावेळी पदयात्रा, गाठीभेटी, सभा आणि आश्वासनांची खैरात तसेच आरोप प्रत्यारोप पाहायला मिळणार आहे. आज प्रचारतोफा थंडावल्यानंतर गुप्त बैठका, राजकीय डावपेच रंगताना दिसणार आहे. मतदानापूर्वीचे ४८ तास महत्त्वाचे असल्याने राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हालचालींवर निवडणूक पथकाकडून करडी नजर ठेवली जाणार आहे.