– दक्षिण नागपूर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने युवा संमेलन
नागपूर :- कट-आऊट्स आणि पोस्टर्स लावून सर्वसामान्य लोकांची मने जिंकता येत नाहीत. त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचून आपण गेल्या दहा वर्षांत केलेली कामे सांगावी लागतील आणि त्याचवेळी विकासाचा ‘पिक्चर अभी बाकी है’ हेही त्यांना सांगावे लागेल, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) युवा कार्यकर्त्यांना केले.
दक्षिण नागपूर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रेशीमबाग येथील जैन कलार सांस्कृतिक सभागृहात आयोजित युवा संमेलनात ना. नितीन गडकरी बोलत होते. यावेळी आमदार मोहन मते, भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, देवेंद्र दस्तुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. गडकरी म्हणाले, ‘विरोधक आपल्याबद्दल लोकांच्या मनात वीष कालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारताचे संविधान बदलण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आरोप करीत आहेत. पण काँग्रेसने जे ६५ वर्षांमध्ये केले नाही, ते आपण फक्त दहा वर्षांमध्ये करून दाखवले आहे. आपण जात-पात-धर्माचा भेद न करताना विकास केला आहे.
सबका साथ सबका विकास सबका प्रयास हेच आपले धोरण राहिले आहे. त्यामुळे आपल्या पक्षाची विचारधारा, पक्षाची कामे लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. आणि हे काम माझे माझे कार्यकर्तेच करू शकतात, याचा मला विश्वास आहे. कार्यकर्तेच पक्षाची मोठी शक्ती आहेत.’ मिहानमध्ये जगातील मोठ्या कंपन्या आल्या आहेत. याठिकाणी नागपुरातील ६८ हजार तरुणांना रोजगार मिळाला. आणखी मोठ्या प्रमाणात रोजगार येत्या काळात निर्माण होणार आहे. नागपुरात मेट्रो आल्यामुळे अनेकांच्या हाताला रोजगार मिळाला. रस्ते, उड्डाणपूल, एम्स, ट्रिपल आयटी अशा कित्येक सुविधा नागपूरच्या जनतेसाठी उपलब्ध झाल्या आहेत. उद्योगांना प्रोत्साहन देऊन त्या माध्यमातून विदर्भातील तरुणांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण एडव्हांटेज विदर्भ औद्योगिक महोत्सवाचे आयोजन केले. खासदार सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून कलावंत व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले, असेही ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.