दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरुपी व्यवस्था निर्माण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वैद्यकीय महाविद्यालयालाही हिरवी झेंडी

 जिल्ह्यातील पूर  परिस्थितीचा आढावा 

        नागपूर  :  गडचिरोली जिल्ह्यात दर पावसाळ्यात पुरामुळे गावांचा संपर्क तुटणे योग्य नाही. त्यामुळे ही समस्या कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी शाश्वत उपाययोजना केल्या जातील. तसेच वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली येथील आढावा बैठकीत सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. भामरागड, अहेरी व सिरोंचा तालुक्यातील अनेक रस्ते पुराच्या पाण्यामुळे बंद आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीचा गडचिरोली दौरा केला. खराब हवामानामुळे नागपूर येथून हवाई मार्गाने येणे व पाहणी करणे शक्य झाले नाही, मात्र रस्ते मार्गाने येऊन त्यांनी पाहणी केली. त्यानंतर नियोजन भवन येथे जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक घेतली.

खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर, पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यावेळी उपस्थित होते. तसेच तालुकास्तरावरुन उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व गट विकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी तहसिलदार, तसेच वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले.

गडचिरोलीच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच भेटीत जिल्ह्याच्या दोन प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून दिला. यापूर्वी पालकमंत्री म्हणून काम केलेल्या एकनाथ शिंदे यांनी  दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरुपी व्यवस्था निर्माण करण्यासोबतच गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ते आज पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथे आले होते. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

तत्पूर्वी गडचिरोलीकडे जाताना आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर बैठकीमध्ये  नैसर्गिक आपत्तीत जीवित हानी होणार नाही, यासाठी यंत्रणांनी समन्वयातून तातडीने मदत व बचावकार्य हाती घ्यावे. तसेच पूर बाधितांचा सर्व्हे करुन तातडीने मदत करावी, जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्तांना निवारा केंद्रात आवश्यक सेवा पुरवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच पूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे सुरु करावेत,  जिल्हा प्रशासनातील विभागांनी सतर्क राहून आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सज्ज रहावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती करावी. वन विभागामुळे अडलेल्या रस्त्यांचा प्रश्न निकाली काढावा. संजय सरोवर, गोसीखुर्द व मेडीगट्टा बॅरेजचा पाणीसाठा व विसर्गासंदर्भात उत्तम समन्वय ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षमपणे काम करण्यासाठी सूचना केली तसेच अधिकारी कर्मचारी यांनी अशा गंभीर परिस्थितीत मुख्यालयी राहणे अनिवार्य असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून प्रशासकीय कामांची सुरुवात गडचिरोली जिल्ह्यापासून करायची असे आमचे ठरले होते, मात्र राज्यातील पूर परिस्थितीमुळे तातडीने गडचिरोलीमध्ये यावे लागले व कामाची योगायोगाने सुरुवात झाली असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी संजय मीना यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, पूरस्थिती, स्थलांतरीतांबाबत माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महानिर्मितीच्या छत्तीसगढ येथील गरेपालमा-२  प्रस्तावित कोळसा खाणीला पर्यावरण मंजूरी

Tue Jul 12 , 2022
नागपूर : केंद्र सरकारच्या पर्यावरण,वने आणि वातावरण बदल मंत्रालयाने नुकतेच ११ जुलै रोजी महानिर्मितीच्या छत्तीसगढ येथील गरेपालमा-२  प्रस्तावित कोळसा खाणीला पर्यावरण मंजूरी दिली आहे. सुमारे २५८३.४८ हेक्टर परिसरातील या कोळसा ब्लॉकची क्षमता २२ दशलक्ष मेट्रिक टन प्रतीवर्ष खुल्या खदानीतून तर १.६ दशलक्ष मेट्रिक टन प्रतीवर्ष भूमिगत खदाणीची आहे. रायगढ जिल्ह्यातील घरगोंडा तहसील अंतर्गत गरेपालमा-२  हा कोळसा ब्लॉक असून या खाणीतून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com