संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- शासनाच्या वतीने दुर्बल घटक व मागास वर्गातील विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते परंतु आपल्या पोटाला मारून मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी पैसा देऊन आवश्यक कागदपत्रे बनवीत असलेल्या पालकांच्या मुलांना मागील तीन वर्षांपासून कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने विद्यार्थी व पालकामध्ये रोष व्यक्त होत आहे.शिक्षक त्यांना शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायला सांगतात तेव्हा पालक शिक्षकांना शिष्यवृत्तीच मिळत नाही तर फॉर्म भरायचा कशाला असा प्रश्न करीत आहेत.
समाजातील उपेक्षित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शासन विविध प्रकारच्या 40 शिष्यवृत्ती योजना राबवित आहे.त्यासाठी दरवर्षी शिक्षण विभाग, समाजकल्याण विभाग ,आदिवासी विकास प्रकल्प विभाग आदी सर्व संबंधित विभागाच्या वतीने दरवर्षी प्रत्येक शाळा पत्र निर्गमित करून शिष्यवृत्तीसाठी प्रोत्साहन देते .आवश्यक कागदपत्रे जोडून शिष्यवृत्ती अर्ज मागविण्यात येतात .शाळा शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरतात .शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे भरण्यासाठी प्रोत्साहित करते ,शीष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालक व विद्यार्थ्यांचा पैसा व वेळ खर्च होतो आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी शासकीय कार्यालये आणि सेतू केंद्रावर विद्यार्थी पालक पायऱ्या झिजवीतात आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरले जातात त्यांची मूळ प्रत समाजकल्याण कार्यालयात जमा केली जाते यानंतर शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा होईल असे अपेक्षित असते मात्र मागील तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळण्याची अपेक्षा भंग होत आहे.