देवेंद्र फडणवीस या राजकीय नेत्याचे कर्तृत्व जेवढे मोठे तेवढाच या कर्तृत्वातून त्यांना येणारा मनस्तापही मोठा आहे. २०१४ मध्ये फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना ही गोष्ट अनेक दिवस पचनी पडली नाही. हा कालचा मुलगा मुख्यमंत्री झाला, हे सत्य ते सहनही करायला तयार नव्हते. मुख्यमंत्री झाल्याच्या पहिल्या दिवसापासून फडणवीसांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देणे सुरू झाले. या पाच वर्षात फडणवीसांना नामोहरण कसे करता येईल, याचे षड्यंत्र रचले जायचे. या कारस्थानी लोकांचे शिरोमणी होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार.
एक ब्राम्हण तरुण स्वकर्तृत्वाने स्वत:च्या बुद्धिमतेच्या बळावर मुख्यमंत्री होतो. ही गोष्ट आयुष्यभर जातीचे राजकारण करणाऱ्या शरद पवारांना आवडणारी नव्हती. तसेही कर्तृत्ववान, प्रतिभासंपन्न, अभ्यासू नेत्यांची शरद पवारांना अॅलर्जी आहे. त्या नेत्यांना पवार कधीच मोठे होऊ देत नाहीत. विलासराव देशमुखांना पवारांनी असाच त्रास दिला. डॉ. श्रीकांत जिचकार या उच्च विद्याविभूषित आणि सुसंस्कृत नेत्याचा पवारांनी आयुष्यभर दु:स्वास केला. जिनिअस असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांची त्यांनी नेहमी हेटाळणी केली. ही माणसं मोठी होऊ नयेत, मोठी झाली तर आपलं राजकारण धोक्यात येईल, अशी भीती शरद पवारांना सतत वाटत असते. त्याच भितीतून ते आपले पुतणे अजित पवार यांचेही पंख छाटत असतात. २००४ मध्ये सर्वाधिक आमदार असूनही पवारांनी आपल्या पक्षाकडे मुख्यमंत्रिपद घेतले नाही. ते याच भितीतून की, अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आपले कौटुंबिक राजकारण धोक्यात येईल.
पवारांचे हे पाताळयंत्री राजकारण आयुष्यभर असेच सुरू आहे. याच वृत्तीमुळे क्षमता असूनही ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, पी. व्ही. नरसिंहराव, सोनिया गांधी या सर्वांच्या पाठीत त्यांनी वेळोवेळी खंजीर खुपसला. त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात यातील अनेकांनी नंतरच्या काळात त्यांच्याशी जुळवून घेतले. अगदी सुधाकरराव नाईक यांच्यासारखे स्वाभिमानी नेतेही नंतर त्यांच्या वळचळणीला गेले.
केवळ यात अपवाद होता देवेंद्र फडणवीसांचा. फडणवीस मुख्यमंत्री असताना पवार त्यांना त्यांच्या जातीवरून शेलकी टीका करायचे. कोपर्डीच्या दुर्देवी घटनेनंतर तिथे जाऊन अॅट्रोसिटी कायद्याच्या विरोधात बोलणारे हेच पवार होते आणि त्यानंतरच मराठा समाजाचे मोर्चेही निघू लागले, हे सर्व फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठीच होते.
मध्यंतरी अडीच वर्षे फडणवीस विरोधी पक्ष नेते होते. त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक करण्याचे षडयंत्र रचले गेले. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. याच अटीवर त्यांना पोलीस आयुक्त करण्यात आले. हे पांडे कुणाचे विश्वासू होते? ही गोष्ट सर्वांनाच ठाऊक आहे.
आता एकनाथ शिदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, त्यामुळे शरद पवार काही दिवस शांत होते. पण, जसजसे दिवस जात आहेत, फडणवीस पुन्हा मजबूत होत आहेत. ही गोष्ट लक्षात येताच पवारांनी त्यांचे विखारी अस्त्र पुन्हा बाहेर काढले आहे. अलीकडे गृहमंत्री म्हणून फडणवीस कसे नालायक आहेत, हे सिद्ध करण्याचा घाणेरडा खेळ सुरू झाला आहे. संजय राऊत रोज गृहमंत्र्यांवर टीका करीत आहेत. शरद पवारांच्या कन्येने देखील फडणवीसांचा राजीनामा मागितला आहे. हे सर्व हल्ले कुणाच्या आशिर्वादाने सुरू झाले आहेत, हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. शरद पवारांचे राजकारण ज्यांना कळते, त्यांना हे ठाऊक आहे. पवार हे पक्षातील आणि इतर पक्षातील आपल्या विरोधकांना सतत अस्थिर ठेवू पाहतात.
अगदी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत त्यांनी अशीच कारस्थानं रचली होती. खूप वर्षांपूर्वीची घटना आहे, ‘सोबत’कार ग. वा. बेहरे यांच्यावर काही शिवसैनिकांनी हल्ला केला होता. बेहरे यांना यावेळी अमानुष मारहाण करण्यात आली. पण, आपल्या मुल्यांशी प्रामाणिक असलेल्या बेहरे यांनी याबाबत पोलिस तक्रार न करायचे ठरवले होते. त्यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या घरी गेले आणि बेहरेंना तक्रार करण्यासाठी विनंती करू लागले. पण, बेहरेंनी तक्रार करण्यास नकार दिला. त्याच दिवशी संध्याकाळी तत्कालिन गृहराज्यमंत्र्यांनी त्यांना फोन करून शिवसेनाप्रमुखांविरोधात तुम्ही तक्रार करा, मी कारवाई करतो, असा आग्रह धरला. पण, बेहरेंनी पुन्हा नकार दिला. तो आग्रह करणारे गृहराज्यमंत्री होते, शरद पवार. त्याच रात्री हे शरद पवार बाळासाहेब ठाकरेंकडे जेवायलाही गेले. मागील ४५ वर्षात पवारांचे हे राजकारण असेच सुरू आहे.
साधारणत: कुठलाही राजकारणी वयोवृद्ध झाला की, तो रचनात्मक आणि विधायक समाजकारणाकडे वळतो, पण पवारांचे जुने उपद्व्याप तसेच सुरू आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अचानक सुरू झालेली टीका, त्यांना कमकुवत करण्याचे सुरू झालेले प्रयत्न, हे पवारांच्या कटकारस्थानी राजकारणाचाच एक भाग आहे. संजय राऊत हे त्यांचे चाकरमाने आहेत, काँग्रेस नेत्यांना हे माहित असल्यामुळे ते शांत आहेत. देवेंद्र फडणवीस हाच एकमेव राजकारणी आपल्याला पुरून उरू शकतो, ही भिती असल्याने पवारांचे पुढच्या काळात हे प्रयत्न अधिक जोरकसपणे सुरू राहणार आहेत आणि या आणखी एका कारस्थानातून फडणवीस तावून सुलाखून बाहेरही पडणार आहेत.
– भूमिका जी मेश्राम