– व्हॉल्व्ह लावून जलप्रदाय विभागाने केली तातडीने कार्यवाही
नागपूर :- नागपूर महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने सुरेंद्रगड परिसरातील जलवाहिन्यांवर तात्काळ व्हॉल्व्ह लावून या परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडविली. यामुळे या परिसरातील सुरेद्रगड, आयबीएम व आशा बालवाडी या परिसरातील नागरिकांना दोन्ही वेळेस पाणी पुरवठा योग्यरितीने सुरळीत सुरू झाला आहे. ऐन उन्हाळ्यात जलप्रदाय विभागाने तातडीने केलेल्या या कामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सुरेंद्रगड, आयबीएम व आशा बालवाडी या भागातील मुख्य जलवाहिनीवर जलप्रदाय विभागाने तातडीने ३ व्हॉल्व लावल्याने या परिसरातील नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा सुरू झाला आहे. ही समस्या तेथील नागरिकांनी जलप्रदाय विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी या तक्रारीची तात्काळ दखल घेतली. ही सोडविण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली या जलवाहिनीवर प्राधान्याने व्हॉल्व्ह लावण्याचे काम हाती घेण्यात आले. या जलवाहिनीवर एकूण ५ व्हॉल्व्ह लावले जाणार आहेत. त्यापैकी तीन व्हॉल्व्ह लावण्यात आले असून उर्वरित दोन व्हॉल्व्ह येत्या दोन दिवसात लावले जाणार असल्याचे अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी सांगितले.
जलप्रदाय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामाची पाहणी आज अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर, धरमपेठ झोनचे डेलीगेट नरेंद्र भांडारकर, ओसीडब्ल्यूचे अधिकारी प्रवीण शरण व ओसीडब्ल्यूचे झोनल मॅनेजर तंझील शेख उपस्थित होते. यावेळी अनेक नागरिकांनी पाणी पुरवठा योग्यरितीने होत असल्याचे सांगितले.
या जलवाहिनीवर पाचही व्हॉल्व्ह लावल्यानंतर या परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचे अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी सांगितले. या जलवाहिनीवर व्हॉल्व्ह लावल्यानंतर पाण्याचा पुरवठा योग्यरितीने होत असल्याची प्रतिक्रिया या परिसरात श्रीमती लक्ष्मी मारशेट्टीवार व श्रीमती सुरेशा मारशेट्टीवार यांच्यासह अनेक रहिवाशांनी आता पाण्याची समस्या राहिली नसल्याचे सांगितले.